रेल्वे परिसरच नव्हे, रुळांची बाजूही स्वच्छ; पश्चिम रेल्वेकडून कचरा संकलन पॉइंट्स तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:19 AM2024-07-18T10:19:48+5:302024-07-18T10:21:53+5:30
पश्चिम रेल्वे प्रशासन ट्रेनमध्ये स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासन ट्रेनमध्ये स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी स्वच्छ रेल्वे स्थानके आणि ऑन-बोर्ड हाउसकीपिंग सेवा यासारखी व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवासादरम्यान पँट्री कारमधून निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी कचरा संकलन पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून गाड्या आणि रेल्वे परिसरच नव्हे तर रुळांच्या बाजूही स्वच्छ राहतील, असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. ज्या स्थानकांवर प्राथमिक देखभाल केली जाते तेथे लांब पल्ल्याच्या गाड्यांची साफसफाई केली जाते.
... असे होते संकलन
१) मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, रतलाम, भावनगर, वडोदराचा यात समावेश आहे. या उपक्रमांतर्गत पश्चिम रेल्वेमध्ये सुमारे ६०० गाड्या स्वच्छ केल्या जातात. ट्रेनच्या साफसफाईदरम्यान जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.
२) पश्चिम रेल्वेच्या २४ स्थानकांवर पँट्री कारद्वारे कचरा संकलन केले जाते. पँट्री कारमधून ७७ हजार ६०० किलो कचरा (सुका आणि ओला कचरा) गोळा केला जातो.
३) विल्हेवाट लावण्यासाठी पावतीवर संबंधित व्यवस्थापकाची स्वाक्षरी असते. पश्चिम रेल्वेच्या एकूण १७५ गाड्यांमध्ये ऑन-बोर्ड हाउसकीपिंग सेवा आहेत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.