मुंबई : मागील आठवड्यात सफाई कामगारांच्या झालेल्या मृत्यूची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे सार्वजनिक शौचालयाची गटारे आणि मलनिःसारण वाहिन्या साफ करताना सफाई कामगारांना त्यात उतरवायचे असल्यास मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करणे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत शेकडो किमीच्या भूमिगत मलवाहिन्या असून, त्यांच्या सफाईसाठी अनेक वर्षांपासून माणसे मॅनहोलमध्ये उतरवली जातात. मागील आठवड्यात मालाड येथील मालवणी परिसरात तर शनिवारी शिवडी येथे शौचालयाची टाकी आणि मलनिःसारण वाहिन्या साफ करताना ३ सफाई कामगारांचा मृत्यू झाला.
मुळात अशी सफाई करताना माणसांना गटारांत उतरविणे चुकीचे आहे आणि जर अगदीच आवश्यकता असल्यास त्यांच्या सुरक्षेसाठीचे नियम संबंधित कंत्राटदारांनी पाळणे आवश्यक आहे. मात्र, मागील आठवड्यातील घटनांमध्ये कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळले न गेल्याने त्यांचा मृत्यू ओढावल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कंत्राटदारांवर निष्काळजीचा ठपका ठेवण्यात आला असून पुढील कारवाईसाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
‘वेळेत उपचार करा’-
१) घटनेत जखमी झालेल्या कामगारांना योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे.
२) संबंधित जबाबदार कंत्राटदाराला नोटीस देऊन कारवाई करण्यात येईल.
३) मुंबईच्या २४ वॉर्डातील अधिकाऱ्यांना कार्यपद्धती निश्चित करून कंत्राटदारांकडून त्याचे पालन होणे बंधनकारक.
भूमिगत गटारे, मलनिःसारण वाहिन्या सुरक्षित का नाहीत?
१) या गटारात प्राणवायूचा अभाव असतो आणि नायट्रोजन प्रमाण अधिक असल्याने श्वासोच्छ्वासाला त्रास जाणवू लागतो.
२) हे प्रमाण आणखी खाली गेल्यास चक्कर येऊ लागते आणि गुदमरून मृत्यू येऊ शकतो.
३) सांडपाण्यातील घन पदार्थांवर विविध जंतूंच्या माध्यमातून होणाऱ्या रासायनिक क्रियेतही प्राणवायू शोषला जातो. त्यामुळे प्राणघातक वायू तयार होतात जे हानिकारक ठरू शकतात.