आता ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मिळणार; जूनमध्ये चार लाख विद्यार्थ्यांना लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:08 AM2024-07-26T11:08:40+5:302024-07-26T11:11:04+5:30
एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : एसटी महामंडळाने सुरू केलेल्या ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जूनमध्ये केवळ १२ दिवसांत ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास दिले आहेत. मागील वर्षातील जूनच्या तुलनेत ही संख्या सुमारे ८३ हजाराने जास्त आहे. यामुळे उत्पन्न २६ कोटी रुपयांनी वाढले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयात एसटीचे पास देण्याची योजना १८ जूनपासून सुरू केली आहे. प्रत्येक आगारातील कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा-महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रवासी पास देत आहेत.
उत्पन्नात झाली वाढ-
१) जुलैत ही याच पद्धतीने एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास देत आहेत. शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून ६६ टक्के सवलत दिली. केवळ ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास काढता येतो.
२) शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते.
३) यंदा पाससाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून पास थेट शाळेत देण्यात येत आहेत.