लिपिक भरतीचे ‘ते’ विघ्न आता दूर होणार; अटीबाबत फडणवीसांची आयुक्तांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 10:35 AM2024-09-07T10:35:00+5:302024-09-07T10:38:01+5:30
महापालिकेतील लिपिक पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या, मात्र पहिला प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेतील लिपिक पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेल्या, मात्र पहिला प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट रद्द करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली आहे. याबाबत पालिका प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसला, तरी येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
संबंधित निर्णय झाल्यानंतर भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवली जाऊ शकते. लिपिक पदाच्या १,८४६ जागा भरण्याचा निर्णय झाल्यानंतर २० ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. ९ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी पालिकेत मोठ्या संख्येने अर्ज येऊ लागले आहेत. मात्र, पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट टाकण्यात आल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला. अनेकांना विविध कारणास्तव पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे जमलेले नाही. अशा उमेदवारांची संधी या अटीमुळे हिरावली गेली होती.
कलगीतुरा रंगला-
अट रद्द करण्याची मागणी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली होती. अट रद्द न केल्यास ऐन उत्सवाच्या काळात युवकांना आणि भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. शुक्रवारी फडणवीस यांनी अट रद्द करण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली. त्यावर ठाकरे यांनी क्रेडिट घेण्याचे राजकारण नको, आदेश जारी करा. पण, नगरविकास खाते तुमचे ऐकणार का?, असा सवाल केला.