मुंबई : मुंबईतला पाणीपुरवठा करणारे जलवाहिन्यांचे जाळे जुनाट झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन, शहराच्या पाणीपुरवठा जाळ्याला बळकटी आणण्यासाठी महापालिकेने ठाण्याच्या कशेळी ते मुलुंडपर्यंत नवीन जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी खिडाई यंत्राचा वापर करून बोगद्याचे, तसेच जलवाहिन्यांची इतर कामे पालिकेकडून येत्या १ ऑक्टोबरपासून करण्याचे नियोजन आहे.
जलबोगद्याचे आराखडे नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले असून, या परिसरातील रहिवाशांना किंवा इतर संस्थांना त्यावर आक्षेप असल्यास एक महिन्यात कळविण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा हा अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांतून होतो. सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे असे जाळे आहे. तर ९० किलीटरचे भूमिगत जलवाहिन्यांचेही जाळे आहे. मात्र, या जलवाहिन्यांना कधी विकासकामांच्या प्रकल्पामुळे, तर कधी विविध विकासकांमुळे फटका बसतो आणि पाणीपुरवठ्यात दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे जल बोगद्यांचा पर्याय पालिकेने आणला आहे. हे जल बोगदे जमिनीखाली १०० मीटर अंतरावर असल्यामुळे विकासकामांचा फटका बसून जलवाहिन्या फुटण्याची परिस्थिती येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालिका या जल बोगद्याचा-
पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्यास सुरुवात करणार आहे. विद्यमान जलवाहिन्यांचे जाळे हे संरक्षित म्हणून असेल. बोगद्यामुळे पाणीपुरवठ्यात फार मोठी वाढ होणार नसली, तरी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट पाणीपुरवठा मालमत्ता सुरक्षित करणे हे आहे. ठाणे, पालघर, नाशिकमधून येणाऱ्या जलवाहिन्या या जमिनीवर असल्याने त्यांना धोका आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बोगद्यातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत गरज-
१) सुरक्षेचा उपाय म्हणून, शहराची पाणीपुरवठ्याची संरक्षित योजना आवश्यत असते. संरक्षित योजना नसते, तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित होण्याची भीती असते.
२) त्यामुळे नवीन संरक्षित पाण्याच्या बोगद्याची वारंवार गरज भासते आहे. याचा अनुभव पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर आला आहे. जलवाहिन्या फुटल्यामुळे गेल्या वर्षभरात शहराच्या पाणीपुरवठ्यावर अनेकदा परिणाम झाला.
३) काही वेळा मेट्रोच्या कामांमुळे जलवाहिन्या फुटल्या. परिणामी, अंधेरी, जोगेश्वरी, जुहू आणि इतर भागांतील नागरिकांना जवळपास पाच दिवस पाणीपुरवठा झाला नाही. ही बाब लक्षात घेता पर्यायी व्यवस्था आवश्यक आहे.