मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळाली असून, आतापर्यंत दक्षिणमार्गिकेवरून १२ लाख २८ हजार २७९ वाहनांनी प्रवास केला आहे, तर दुसरीकडे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८० हजारांहून अधिक वाहने धावली. वरळी ते मरिन ड्राइव्हदरम्यान एका मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यानची मार्गिका खुली झाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होत आहे. ४० मिनिटांच्या प्रवासासाठी आठ ते दहा मिनिटे लागत असल्याने मुंबईकर कोस्टल रोडला पसंती देत आहेत. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास १२ मिनिटांत करता येईल.
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची (कोस्टल रोड) वरळी ते मरिन ड्राइव्ह ही दक्षिण मार्गिका मार्चमध्ये खुली झाली, तर उत्तर मार्गिका ११ जूनपासून सुरू झाली. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. दक्षिण वाहिनीवरून पहिल्याच दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १५ हजार ८३६ वाहनांनी प्रवास केला होता, तर उत्तर वाहिनीवरून पहिल्या दिवशी २० हजार वाहने मार्गस्थ झाली.
कोस्टल रोड (मरिन ड्राइव्ह ते वरळी-दक्षिण वाहिनी)-
वाहनांची संख्या-
१) मार्च २०२४- २,६३,६१०
२) एप्रिल २०२४ - ४,३६,१५०
३) मे २०२४- ५,२८,५१९
४) ११ जून -२०,४५०
मरिन ड्राइव्ह ते वांद्रे प्रवास जुलैनंतर कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ८९.६७ टक्के काम पूर्ण झाले असून, जुलैपर्यंत वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीसाठी बो स्ट्रिंग आर्च गर्डर बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. जुलैअखेर वांदे वरळी सी-लिकचा प्रवास करणे शक्य होणार आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर मरिन ड्राइव्ह ते वांदे हा प्रवास फक्त १२ मिनिटांत करता येईल.