Join us

मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात अयशस्वी ठरत आहोत - डॉ. भालचंद्र मुणगेकर 

By संजय घावरे | Updated: June 17, 2024 17:49 IST

आजच्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात आपण अयशस्वी ठरत असल्याची खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.

मुंबई 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...' हा मानवतेचा महामंत्र साने गुरुजींनी जगाला दिला. देशभक्ती, आत्मसन्मान शिकवला, पण अलीकडे परिस्थिती बिकट होत चालली आहे. आजच्या २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांपर्यंत साने गुरुजी पोहोचविण्यात आपण अयशस्वी ठरत असल्याची खंत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. साने गुरुजींच्या ७४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुणगेकर बोलत होते.  

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय व साने गुरुजी बालविकास मंदिर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'आजचा श्याम घडताना' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुणगेकर म्हणाले की, सध्या साने गुरुजींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना, युवक-युवतींना 'श्यामची आई' हा राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता सिनेमा दाखविण्यात यावा. साने गुरुजी म्हणजे महाराष्ट्राचा अलौकिक असा सांस्कृतिक वारसा आहेत. हा वारसा जोपासण्याच्या दृष्टीने ज्या ज्या पद्धतीने प्रयत्न करता येतील त्या त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया, असेही मुणगेकर म्हणाले. साने गुरुजींचा सहवास लाभलेले त्यांचे निष्ठावान अनुयायी साने गुरुजी बालविकास मंदिराचे अध्यक्ष यशवंतराव क्षीरसागर यांनी गुरुजींच्या हृद्य आठवणी सांगितल्या. यावेळी प्राचार्य विनायकराव क्षीरसागर यांच्या 'ईश्वर दर्शन' या पुस्तकासह रविकुमार पौडवाल यांच्या 'शुभचिंतन' या कवितासंग्रहाचे आणि 'बालविकास मंदिर' मासिकाच्या साने गुरुजी स्मृतिदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. 'बालविकास मंदिर' मासिकाचे संपादक जीवन यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रसाद महाडीक यांनी सूत्रसंचालन केले. 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड 'आजचा श्याम घडताना' विषयावर म्हणाले की, आपण आजच्या श्यामला घडवताना तू हे करू नकोस, ते करू नकोस असे सांगत असतो, पण त्याने काय करावे हे सांगत नाही. तू पुस्तक वाच असे पाल्याला सांगताना त्यासाठी प्रथम पालकांनी पुस्तके वाचायला हवीत. आजच्या बालपिढीचे, मुलांच्या मनावर संस्कार करण्यासाठी पुस्तकासारखा दुसरा पर्याय नाही. मुलांना चांगल्या पुस्तकांकडे आकर्षित करू शकल्यास आपल्या इतके भाग्यवान कुणीही नसल्याचेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :मुंबईसाने गुरुजी