लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्टदरम्यान अनेक प्रवासी भटकंतीवर होते. या काळात अनेकांनी एसटीने प्रवास केला असून, याद्वारे एसटी महामंडळाला १२१ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
२० ऑगस्टला एका दिवशी ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले असून, यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. एसटीला दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळते. कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असा मोठा प्रवासी वर्ग एसटीमधून प्रवास करतो. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची गर्दी झाली होती. रक्षाबंधन दिवशी म्हणजे सोमवारी ३० कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ३५ कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. दोन दिवसांत १ कोटी ६ लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. त्यात महिला प्रवाशांची संख्या ५० लाख आहे.
कर्मचाऱ्यांचे अभिनंदन-
१) आपल्या घरी सण असूनही कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले आहे.
२) शिवाय रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.