Join us  

एक कोटी ३१ लाख प्रवाशांचे ऑगस्टमध्ये विमानाने ‘टेक ऑफ’; गतवर्षीच्या तुलनेत ५.७ टक्क्याने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 10:14 AM

देशात विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, ऑगस्टमध्ये एक कोटी ३१ लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशात विमानप्रवास करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, ऑगस्टमध्ये एक कोटी ३१ लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण एक कोटी २४ लाख लोकांनी विमानप्रवास केला होता. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी ऑगस्टमध्ये ही वाढ ५.७ टक्के अधिक आहे.

‘डीजीसीए’कडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्टदरम्यान एकूण १० कोटी ५४ लाख प्रवाशांनी आतापर्यंत विमानप्रवास केला आहे. आजवरचा हा एक विक्रम मानला जात आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांच्या तुलनेत विमानप्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ ४.८२ टक्के अधिक आहे. चालू वर्षातदेखील इंडिगो कंपनीने ६२ टक्क्यांच्या मार्केट हिस्सेदारीसह आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. एअर इंडिया कंपनीची मार्केट हिस्सेदारी १४ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर विस्तारा कंपनीच्या मार्केट हिस्सेदारीत वाढ होत तो आकडा १० टक्क्यांवर पोहोचला आहे. विमानसेवा सर्वाधिक वेळेवर ठेवण्यात अकासा कंपनी अव्वल ठरली आहे. 

इंडिगो आणि एअर इंडिया या दोन्ही कंपन्या या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आर्थिक गर्तेत अडकलेल्या ‘स्पाईस जेट’च्या विमानांना सर्वाधिक विलंब झाला आहे.

एक लाख ७९ हजार प्रवाशांना विलंबाचा फटका-

१) गेल्या महिन्यात एक लाख ७९ हजार ७४४ प्रवाशांना विविध कारणांमुळे विविध विमान कंपन्यांच्या विमानांना विलंब होणे किंवा विमान रद्द होण्याचा फटका बसला आहे. 

२) या प्रवाशांना दोन  कोटी ४४ लाख रुपयांची भरपाई विमान कंपन्यांना द्यावी लागली आहे. 

३) विविध कारणांमुळे एकूण ७२८ प्रवाशांना विमानप्रवास नाकारण्यात आला असून, या प्रवाशांना एकूण ७७ लाख ९६ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईविमान