Join us  

‘महाकृती’ वेबसाइट वापराचे ऑनलाइन प्रशिक्षण; ५५० बिल्डर, ३५० एजंटसची महारेराने घेतली ‘शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 11:58 AM

महारेराची नवीन वेबसाइट महाकृती सुरू झाली आहे. या वेबसाइटचा सर्वांना वापर करता यावा यासाठी मार्गदर्शक व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महारेराची नवीन वेबसाइट महाकृती सुरू झाली आहे. या वेबसाइटचा सर्वांना वापर करता यावा यासाठी मार्गदर्शक व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वेबसाइट सुरू झाल्यापासून दोन आठवड्यांपर्यंत ऑनलाइन प्रशिक्षणही सुरू असून, या काळात शंकांचे निरसनही करण्यात येत आहे. 

यात तक्रारदारांसाठी, वकिलांसाठी तक्रारी कशा नोंदवाव्यात आणि त्याची पुढील प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रशिक्षणाचा सुमारे ५५० बिल्डर,  ३५० एजंटस आणि २५० च्यावर वकिलांनी आणि तक्रारदारांनी लाभ घेतलेला आहे.

बिल्डर आणि त्यांच्या संस्था यांना नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, गरजेनुसार दुरुस्ती,  नूतनीकरण, तीन महिन्यांचा प्रगती अहवाल, वार्षिक प्रगती अहवाल, प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दलचे प्रपत्र ४ या नेहमीच्या कामांसाठी वेबसाइटचा वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील एजंटसनाही त्यांची नोंदणी, दुरुस्ती, नूतनीकरण अशा त्यांच्या नेहमीच्या कामांबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. एकूण सर्वांना ही कामे करताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी  सोडविण्यासाठी मदत केली जात आहे.

पासवर्ड्स बदलले...  

१) आतापर्यंत २७६६ नियमित वेबसाइट वापरकर्त्यांनी नवीन वेबसाइटवर लाॅग इन करून त्यांचे पासवर्ड्स बदलले.

२) ५८१ बिल्डरांनी त्यांची वेबसाइटवरील माहिती अद्ययावत करून ८ जणांनी नवीन प्रकल्पासाठी नोंदणी केली. एकाने नूतनीकरणासाठी अर्ज केला.

१७ ग्राहकांनी नोंदवल्या तक्रारी-

नवीन एजंटस नोंदणीसाठी २१ जणांचे अर्ज आले असून, ६ एजंटसनी नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. ८४ एजंटसनीही नवीन वेबसाइट त्यांची माहिती अद्ययावत केली आहे. १७ ग्राहकांनी नवीन वेबसाइटवर तक्रारी दाखल केल्या आहेत.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग