Join us  

अत्यल्प गटासाठी केवळ ३५९ घरे; म्हाडाच्या घरांसाठीचे गोरगरिबांचे स्वप्न अपूर्णच 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:20 AM

‘म्हाडा’ने मोठा गाजावाजा करत २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात मात्र घरांच्या किमतींवरून म्हाडावर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई  : म्हाडा’ने मोठा गाजावाजा करत २ हजार ३० घरांची लॉटरी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात मात्र घरांच्या किमतींवरून म्हाडावर सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे. त्यात आता लॉटरीमध्ये अत्यल्प गटातील नागरिकांसाठी केवळ ३५९ घरे उपलब्ध करून देण्यात आल्याने अत्यल्प गटात मोडणाऱ्या मुंबईकरांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

मुंबई मंडळाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश लॉटरीत समावेश असून, पंतप्रधान आवास योजनेमधील घरांच्या किमतीही गेल्या लॉटरीच्या तुलनेत वाढल्या आहेत. गेल्यावर्षी या घरांची किंमत ३० लाख होती. यावर्षी ३४ लाख आहे. गोरेगाव पहाडी येथे घरे आहेत. तर ताडदेव येथील घरांच्या किमतीने मुंबईकरांचे डोळेच फिरले आहेत. सर्व्हर डाऊन असल्यामुळे अशा अडचणी येत असल्याचे अर्जदारांचे म्हणणे असले तरी म्हाडाकडून काहीच स्पष्ट केलेले नाही.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध घरे-

१) अँटॉप हिल वडाळा- ८७ 

२) विक्रोळी कन्नमवार- २८ 

३) विक्रोळी कन्नमवार- २

४) अँटॉप हिल वडाळा- १२४ 

५) पहाडी गोरेगाव- ८४ 

६) विक्रोळी कन्नमवार- ३३ 

७) पीएमजीपी मानखुर्द- १

टॅग्स :मुंबईम्हाडा