Join us

मुंबई स्वच्छ राहणार कशी? शहरातील २४ वॉर्डांत केवळ ४८ स्वच्छता निरीक्षक कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:07 AM

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांची पदे निम्म्याहून अधिक रिक्तच आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकांची पदे निम्म्याहून अधिक रिक्तच आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये चार स्वच्छता निरीक्षकांची (सॅनिटरी इन्स्पेक्टर) आवश्यकता असताना केवळ दोनच तैनात असतात. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत या निरीक्षकांवर कमालीचा ताण येत आहे. शहराची लोकसंख्या दीड कोटी आणि त्यावर लक्ष ठेवणारे स्वच्छता निरीक्षक अवघे ४८ असल्याने शहराचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

महापालिकेच्या हद्दीत एकूण २४ विभाग कार्यालये आहेत. आरोग्य विभागातर्फे एक वैद्यकीय आरोग्य अधिकारी नियुक्त असतो. प्रत्येक वॉर्डमध्ये अंदाजे आठ लाख इतकी लोकसंख्या असते. प्रत्येक वॉर्डात चार स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक असते; परंतु सध्या ‘एन- वॉर्ड’ (घाटकोपर) मध्ये फक्त एक, तर ‘एम- पश्चिम’ (चेंबुर)मध्ये दोन निरीक्षक कार्यरत आहेत. ‘एम- पूर्व वॉर्ड’ (गोवंडी) येथे दोन, ‘एस- वॉर्ड’ (भांडुप) येथे दोन, ‘टी-वॉर्ड’ (मुलुंड) येथे दोन असे प्रत्येक वॉर्डमध्ये एक, दोनच स्वच्छता निरीक्षक आहेत.

बेकायदा धंद्यांना पेव-

१)  शहरातील २४ वॉर्डांमध्ये प्रत्येकी चार स्वच्छता निरीक्षक असे जवळपास १०० स्वच्छता निरीक्षक कार्यरत असणे आवश्यक असताना केवळ ४५ ते ५० स्वच्छता निरीक्षक आहेत. 

२) मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात आणि स्वच्छता निरीक्षक ४८ म्हणजे निम्मेच असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत असल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडून येत आहेत. 

३) परिणामी अस्वच्छता पसरवणारे चायनीजवाले, स्टॉलवाले यांच्याविरोधात जितकी प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे ती मनुष्यबळाअभावी होत नाही. 

४) प्रत्येक वॉर्डमध्ये बेकायदा धंद्यांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते. त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करून रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी खु्द्द अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊसआरोग्य