मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या गुणवान विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत शिक्षण घेता यावे, यासाठीचे शिक्षण शुल्क तसेच व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता १४ कोटी रुपयांपर्यंतची तजवीज करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
१) पालिकेच्या अर्थसंकल्पात या योजनेचे सूतोवाच करण्यात आले होते. आता प्रत्यक्षात आर्थिक तरतूद करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला जाणार आहे. दहावीत पहिल्या आलेल्या १०० विद्यार्थ्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी पालिका घेणार आहे.
२) विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घ्यायचे असल्यास कोचिंगकरिता आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्याच्या व केंद्राच्या एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठीही अर्थसहाय्य केले जाणार आहे.
मदतीचे स्वरूप-
मेडिकल, इंजिनिअरिंगच्या नीट, जेईई, एमएचटी-सीईटी सारख्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कोचिंग क्लासकरिता लागणारे शुल्क दिले जाणार आहे. पालिका शाळेतून दहावीला पहिल्या आलेल्या १०० विद्यार्थ्यांनाच ही योजना लागू राहील.
१०० विद्यार्थ्यांना योजना लागू-
केंद्र-राज्य सरकारच्या यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता खासगी कोचिंगचे ५० हजार रुपयांपर्यंतचे शुल्क दिले जाईल. पालिका शाळेतून दहावीला पहिल्या आलेल्या १०० विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहील.
खर्च वर्षागणिक वाढणार-
पुढील सात वर्षांत येणाऱ्या खर्चाचा विचार करून या योजनेकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी १०० विद्यार्थ्यांकरिता तरतूद करावयाची झाल्यास सव्वाकोटीपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार पुढील सात वर्षांत ७०० विद्यार्थ्यांचा विचार करता १४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी नवीन बॅच येणार असल्याने हा खर्च वर्षागणिक वाढत जाणार आहे.