मुंबई : धारावी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंड येथे करण्यास मुलुंडकरांनी विरोध दर्शविल्यानंतर आता दहिसर भागातही पुनर्वसनास विरोध होऊ लागला आहे. दहिसर येथील जकात नाक्याच्या जागेचा वापर हा पार्किंग हबसाठीच व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दहिसर विभाग हा मुंबईच्या वेशीवर आहे. येथे बाहेरहून-परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर वाहने येतात. तसेच मुंबईतूनही मोठ्या संख्येने वाहने मुंबई बाहेर जातात. या ठिकाणी आधी मुंबई पालिकेचा जकात नाका होता.दोन वर्षांपूर्वी तो बंद केला होता. आता या ठिकाणी पार्किंग हब बनविण्याची पालिकेची योजना आहे. मुंबई बाहेरहून येणारी वाहने येथेच थांबवीत. मुंबईत वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी पार्किंग हबची योजना आहे. जवळपास दीड ते दोन हजार वाहने या ठिकाणी उभी केली जाऊ शकतात.
... तर समस्येवर निघू शकतो तोडगा
१) सध्या धारावी प्रकल्पबाधितांचेपुनर्वसन दहिसरमध्ये करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्यास दहिसरमधील नागरिकांनी विरोध आहे.
२) आधीच येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी, वाहतूककोंडी होते. याचा आम्हाला त्रास होतो. पार्किंग हबमुळे या समस्येवर तोडगा निघू शकतो. इथे पार्किंग हबच होणे आवश्यक आहे, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. आता मुलुंडपाठोपाठ दहिसर येथील जागेचाही वाद चिघळण्याची शक्यता आहे.