Join us  

ॲमेझॉनवरून मागविला मोबाइल, मिळाला कप सेट; माहीममध्ये ५४ हजारांच्या फसवणुकीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 11:59 AM

बेस्टमधील अभियंत्याने ॲमेझॉनवरून ५४ हजारांचा मोबाइल ऑर्डर केला. मात्र, प्रत्यक्षात हाती चहा कप सेट लागल्याचा प्रकार माहीममध्ये समोर आला आहे.

मुंबई : बेस्टमधील अभियंत्याने ॲमेझॉनवरून ५४ हजारांचा मोबाइल ऑर्डर केला. मात्र, प्रत्यक्षात हाती चहा कप सेट लागल्याचा प्रकार माहीममध्ये समोर आला आहे. अखेर त्याने पोलिसांत धाव घेत ॲमेझॉन ॲप आणि अपारिओ रिटेल प्रायव्हेट लिमीटेड कंपनीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

माहीम परिसरात राहणारे अमर चव्हाण (४२) हे बेस्टमध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. १३ जुलैला त्यांनी कामावर असताना ॲमेझॉन ॲपवरून ५४ हजार ९९९ रुपयांचा ५ जी  मोबाईल बुक केला. त्याचे पैसेही ऑनलाईन ट्रान्सफर केले. १५ जुलैला मोबाइलची डिलिव्हरी होणार असल्याचे त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर भिवंडीच्या अपारिओ रिटेल  कंपनीचा डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन घरी आला. मोबाइल आल्याचे समजताच तक्रारदार चव्हाण यांनी घर गाठले. मात्र बॉक्स उघडून बघताच त्यात मोबाइलऐवजी कप सेट दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ ॲमेझॉन ॲपवर तक्रार केली.  त्यावेळी ॲमेझॉनच्या ग्राहक सेवेचा क्रमांक मिळाला. त्यांनी टीमशी बोलून चौकशी करतो, असे चव्हाण यांना सांगितले. त्यानंतर २० जुलैला ग्राहक सेवेमधून एकाने कॉल करून कोणत्याही प्रकारची मदत होणार नाही, तसेच पैसे परतही मिळणार नाहीत, असे सांगितल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळले तेव्हा पोलिसांत धाव घेत त्यांनी ॲमेझॉन ॲप आणि अपारिओ रिटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरुद्ध तक्रार दिली.

ॲमेझॉननेच माझी फसवणूक केली...

१) ॲमेझॉन ॲपवरून मोबाईल ऑर्डर करत ऑनलाईन पैसे पाठवल्याने वस्तू ग्राहकापर्यंत व्यवस्थित पोहोच होण्याची जबाबदारी त्यांची आहे. 

२) मात्र, त्यांनी थेट ही जबाबदारी झटकली. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

३) पोलिसांनी योग्य ती चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अमर चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईमाहीमधोकेबाजीपोलिसगुन्हेगारी