हार्बरवर काय हाल झाले, काही विचारू नका! मेगाब्लॉक, पावसामुळे प्रवाशांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 09:51 AM2024-07-22T09:51:10+5:302024-07-22T09:54:09+5:30
रेल्वे प्रशासन जवळपास दर रविवारी मेगाब्लॉक घेत असते. यासंदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाकडून दर शुक्रवारी दिली जाते.
मुंबई : रेल्वे प्रशासनाने देखभाल, दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामासाठी रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकने हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. दुपारी मेगाब्लॉक संपण्यादरम्यान ३ वाजेच्या सुमारास विविध स्थानकांवर आलेल्या प्रवाशांना मुंबईतून नवी मुंबईला जाण्यासाठी हार्बर मार्गावर सुमारे सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
रेल्वे प्रशासन जवळपास दर रविवारी मेगाब्लॉक घेत असते. यासंदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाकडून दर शुक्रवारी दिली जाते. त्याप्रमाणे असंख्य प्रवासी आपल्या प्रवासाचे नियोजन करतात. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कुर्ला स्थानकावर प्रवासी मोठ्या प्रमाणात जमले होते.
लोकल खच्चून भरल्या -
१) प्लॅटफॉर्म नंबर ८ वर पनवेलला जाण्यासाठी ३:२७ ची गाडी लावण्यात आली होती. प्रवाशांनी ती गाडी खच्चून भरलेली होती. त्या गर्दीतून अनेक जण गाडीत शिरले.
२) प्रवासी गाडी सुटण्याची प्रतीक्षा करीत होते; पण प्रशासनाने कोणतीही माहिती न करता गाडी रद्द करून सीएसटीकडे सोडली. त्यामुळे गाडीत जागा बळकावून बसलेल्या प्रवाशांसह उभ्या असलेल्या प्रवाशांनाही गाडीतून उतरावे लागले.
३) काही वेळाने ही गाडी सीएसटीकडे निघून गेली. त्यानंतर पनवेलकडे जाण्यासाठी ५:२० ची गाडी लावण्यात आली. मात्र, ही गाडी संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत आलेली नव्हती. त्यामुळे नवी मुंबई, तसेच पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झाले.