Join us

‘एससीएलआर’साठी संरक्षण दलाची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा; पालिका मोजणार ११ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:43 AM

मुंबई महापालिका या जागेसाठी ११ कोटी रुपये संरक्षण दलाला देणार आहे.

मुंबई : सांताक्रुझ-चेंबूर-लिंक रोड (एससीएलआर) प्रकल्पाच्या वाकोला नाला ते बीकेसीदरम्यानच्या पुलाच्या उभारणीत अडथळा ठरणारी संरक्षण दलाची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिका या जागेसाठी ११ कोटी रुपये संरक्षण दलाला देणार आहे. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात ही जागा येणार आहे.

एमएमआरडीएकडून एससीएलआर प्रकल्पाचे दोन टप्प्यांत काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात एससीएलआर रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला जात आहे. सद्य:स्थितीत या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून आता अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या केबल स्टेड ब्रिजचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होऊन सप्टेंबरपर्यंत हा मार्ग वाहतुकीला खुला होण्याची शक्यता आहे.

कलानगर जंक्शनची वाहतूक कोंडी सुटणार-

एससीएलआर प्रकल्पाची पश्चिम द्रुतगती मार्गाला वाकोला नाल्याजवळ जोडणी दिल्यानंतर कलानगर जंक्शनला होणारी वाहतूककोंडी काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनांना बीकेसीतून थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर पोहोचणे शक्य होईल आणि प्रवास कोंडीमुक्त होईल. 

प्रकल्प मार्गस्थ-

एससीएलआर मार्गाचा वाकोला नाला ते बीकेसी असा विस्तार केला जात असून, त्यासाठी जोडरस्ता उभारला जात आहे. या रस्त्यासाठी हंस भुग्रा रस्त्यावरील ११०० चौरस मीटर जागेची एमएमआरडीएला आवश्यकता आहे. मात्र संरक्षण दलाकडून जागा मिळण्यात विलंब होत असल्याने हा प्रकल्प रखडला होता. आता संरक्षण दलाने जागा देण्यास संमती दिली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाएमएमआरडीएवाहतूक कोंडी