मोरपीस बाळगले तर काय होते? तक्रार दाखल केल्यास होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 11:43 AM2024-07-03T11:43:50+5:302024-07-03T11:46:25+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांशी बाजारपेठांमध्ये विशेषत: दादर, लालबागसारख्या सजावटीचे साहित्य मिळणाऱ्या बाजारात हमखास मोरपीस विकले जात आहे.
मुंबई :मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांशी बाजारपेठांमध्ये विशेषत: दादर, लालबागसारख्या सजावटीचे साहित्य मिळणाऱ्या बाजारात हमखास मोरपीस विकले जात आहे. विविध सजावटीसाठी मुंबईकरांकडून मोरपीसाची खरेदीही केली जाते. मात्र, २० रुपयांपासून वाढीव पैशांना मिळणारे हे मोरपीस मुंबईच्या बाजारपेठेत कोणत्या पद्धतीने आणले जाते ? याचा ठावठिकाणा लागत नाही, मात्र यातून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती पक्षी मित्रांकडून देण्यात आली.
कारवाई केव्हा होते ?
जंगलात मिळणारे मोरपंख वन विभागात जमा केल्यानंतर वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, हे नियम पाळले जात नाहीत. पोलिसांनी कारवाई करायची म्हटले, तरी याची विक्री करणारे लोक पळ काढतात. तक्रार दाखल झाली, तर वन विभागाकडून कारवाई करण्यात येते.
मिळतातच कसे?
जंगलात जाण्यास परवानगी नाही. परवानगी नसताना एवढे मोरपीस कसे येतात? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मोरपीस कशासाठी?
दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान करण्यात आलेल्या सजावटींमध्ये मोठ्या प्रमाणावर मोरपीसांचा वापर होतो.
अनधिकृतपणेविक्री-
१) मुंबईत येणारे मोरपीस हे अनधिकृतरीत्या येते.
२) मटणासाठीही मोराची शिकार होते.
३) शिकारीतून मोराचे पंख बाजारात विकण्यासाठी येतात.
४) पंख विकण्यासाठी प्रमाणपत्राची गरज- ९० टक्के लोकांकडे हे प्रमाणपत्र नसते.
मोरपंख कुठून येते?
आसपासच्या जिल्ह्यांतून, राज्यांतून मोराचे पंख बाजारात येतात. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा येथून मोराचे पंख बाजारात येतात.
वनविभागाकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक -
विक्री करणाऱ्यांना वन विभाग ताब्यात घेते. हे पंख विकण्यासाठी प्रमाणपत्राची गरज लागते. प्रमाणपत्रातून हे मोरपीस गोळा करून आणले आहेत; याकडे लक्ष वेधले जाते. मात्र, ९० टक्के लोकांकडे हे प्रमाणपत्र नसते. हे प्रमाणपत्र वन विभाग देते.
पंख ओढून काढला की, गळून पडला तपासणे सोपे-
दोन ते चार महिन्यांत मोराचे दोन ते चार पंख गळून पडतात. एका मोराच्या शिकारीतून सुमारे दीडशे ते दोनशे पंख मिळतात. मोराचा पंख ओढून काढला आहे की, गळून पडला आहे, हे पाहण्याचीही एक पद्धत आहे. बाजारात उपलब्ध असलेले माेरपीस जबरदस्ती ओढून काढलेले आहेत, असे दिसते.वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये गळून पडलेले मोराचे पंख गोळा केले, तर ते अडचणीचे राहत नाही. मोराला मारून त्याचे पंख गोळा करणे हा गुन्हा आहे. - पवन शर्मा, संस्थापक, रॉ, प्राणी पक्षी मित्र संघटना