Join us

मुंबईकरांची २ बीएचके घरांना सर्वाधिक पसंती; चालू वर्षात विक्रमी उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:23 AM

गेल्या दीड वर्षापासून मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली असली, तरी दुसरीकडे मध्यम वर्ग, तसेच उच्च मध्यम वर्गाकडून २ बीएचके घरांना अधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली असली, तरी दुसरीकडे मध्यम वर्ग, तसेच उच्च मध्यम वर्गाकडून २ बीएचके घरांना अधिक पसंती असल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षात मुंबईत आतापर्यंत झालेल्या गृह खरेदीमध्ये ५७ टक्के वाटा हा २ बीएचके फ्लॅटचा असल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीच्या अहवालात पुढे आली आहे.

'२ बीएचके'ला मागणी का वाढली?

 १) कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करावे लागल्यानंतर अनेकांना आणखी मोठ्या घराची आवश्यकता असल्याची जाणीव झाली.

२) कोरोना काळानंतर घर खरेदीचा बदललेला ट्रेड लक्षात घेत विकासकांनी देखील आपल्या प्रकल्पात २ बीएचके फ्लॅटचे प्रमाण वाढवण्यास सुरुवात केली.

३) तसेच, अलीकडच्या काळात १ बीचके फ्लॅटची निर्मिती जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे किमान दोन बीचके घर घेण्याकडे लोकांचा कल आहे.

घरांच्या किमतीत देखील वाढ ? 

१) मुंबईच्या पश्चिम उपनगरांत आजच्या घडीला परिसरानुसार २ बीचके फ्लॅटच्या किमती या किमान ५० लाख ते कमाल एक कोटी रुपये किया त्यापेक्षा काही अधिक आहेत. 

२) तर, पूर्व उपनगरात या किमती ५० लाख ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. अनेक लोकांनी आपल्या १ बीएचके घराची विक्री करून त्यात भर घालत मोठ्या घरांची खरेदी केल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

३) गेल्या काही वर्षात पश्चिम उपनगरातील विकासकामे पूर्ण झाल्याने येथे घर खरेदीला पसंती मिळते आहे. मात्र, किमती लक्षात घेता बहुतांश नागरिक मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मीरा रोड येथे घरांची खरेदी करताना दिसत आहे.

चालू वर्षात विक्रमी उलाढाल-

१)  चालू वर्षांत आतापर्यंत मुंबई शहरात तब्बल २२ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. 

२) या घरांचे किमान आकारमान दोन हजार चौरस फूट आणि त्यापेक्षा अधिक आहे. २२ हजार ३०० कोटी रुपयांपैकी ३,५०० कोटी रुपयांची घरे ही रिसेलमधील आहेत तर उर्वरित घरे ही नव्याने खरेदी करण्यात आली आहेत.

सहा महिन्यांत अडीच हजार आलिशान घरांची विक्री- 

२ बीचके घरांची विक्री जोमात असली तरी ज्या घराची किमत किमान ४ कोटी रुपये किवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा अडीच हजार घरांची विक्री मुंबईत झाली आहे.

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग