लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सवात कडेकोट बंदोबस्ताबरोबरच महिला सुरक्षेसाठी मुंबई पोलीस विशेष खबरदारी घेणार आहेत. त्यासाठी मिरवणुका, भक्तांच्या रांगा तसेच गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच डीजे, ड्रोन यावरील निर्बंधांसह विसर्जनानंतर गणेशमूर्तीचे फोटो प्रसारणावरील बंदीचा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून, त्यांच्या मिरवणुकीची लगबग आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी विविध भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
दुसरीकडे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापरावर बंदी राहील. दुसऱ्या, पाचव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी वाजंत्री आणि ध्वनिक्षेपकांसाठी काही मर्यादेपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र इतरवेळी आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
गणेश मंडळांना बैठकीत मार्गदर्शन-
अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली संवेदनशील भागातील गणेश मंडळांसोबत बैठका घेत त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. महिला सुरक्षेचा प्राधान्य देत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
शाळा, महाविद्यालयात देखील पोलिसांकडून निर्भया पथकासह पोलीस दीदीकडून मुलांना सुरक्षेचे धडे शिकवण्यात येत आहे.
लेझरसह ड्रोनवर बंदी-
मानवी शरीराला अपायकारक ठरलेल्या लेझर वापराला न्यायालयाच्या आदेशामुळे बंदी केली आहे. त्यासह ड्रोन उडविण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.