मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच; सागरी पर्यावरण, मानवी आरोग्याला कचऱ्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:09 AM2024-08-12T10:09:16+5:302024-08-12T10:10:13+5:30
नुकत्याच जुहू समुद्र किनाऱ्यावरील बेसुमार कचऱ्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मढ समुद्र किनाऱ्याची प्लास्टिक कचऱ्याने झालेली दुरवस्था समोर आली आहे.
मुंबई : नुकत्याच जुहू समुद्र किनाऱ्यावरील बेसुमार कचऱ्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मढ समुद्र किनाऱ्याची प्लास्टिक कचऱ्याने झालेली दुरवस्था समोर आली आहे. वाढते शहरीकरण, तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल, कारखान्यांचे व इतरही सांडपाणी थेट समुद्रात सोडण्याचे प्रकार आणि कचरा व निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून खाडी आणि समुद्रात फेकून देण्याची प्रवृत्ती अशा अनेक कारणांमुळे एकेकाळी सिल्व्हर बीच म्हणून ओळखला जाणाऱ्या मढच्या समुद्रकिनारी प्लास्टिक कचरा आणि घाण साचली आहे.
समुद्र किनाऱ्यांवरील कचऱ्यामुळे सागरी पर्यावरण आणि त्यातील जैवविविधता तर धोक्यात आली आहेच, शिवाय स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी मढ येथील मच्छीमार जेव्हा मासे पकडून आणतो त्यावेळी त्यांच्या जाळ्यात माशांबरोबर प्लास्टिक येत असल्याची माहिती दिली. दरवेळी मच्छीमारांना जाळ्यातून प्लास्टिक वेगळे करावे लागते. मुंबईच्या सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर हीच परिस्थिती असून पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने भरतीत समुद्र आपल्या पोटातील प्लास्टिक आणि घाण किनाऱ्यावर फेकतो, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र या वेळी समुद्रात जमा होणाऱ्या कचऱ्याला आणि प्लास्टिकला पालिका प्रशासनाचे कचरा व्यवस्थापन जबाबदार आहे. किनाऱ्यालगत आणि नाल्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या डम्पिंगमधून कचरा समुद्रात येतो, असे त्यांनी सांगितले.
नागरिकही तितकेच जबाबदार-
१) समुद्रातील प्लास्टिकच्या कचऱ्याला प्रशासनासोबत सामान्य नागरिकही तेवढेच जबाबदार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी मांडले.
२) पालिका सांडपाणी समुद्रात सोडताना प्लास्टिक वेगळे करत नाही, शिवाय ५० मायक्रॉनच्या कमी जाडीच्या पिशव्यांवर कायमची बंदीही अयशस्वी ठरली.
३) सागरी प्रदूषणामुळे अन्नसाखळीत अडथळा निर्माण होऊन सागरी पर्यावरण बिघडत असल्याचे ते म्हणाले. जबाबदार नागरिक म्हणून आपण जबाबदारी पाळत नसल्याने भविष्यात मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी आणि प्लास्टिक जास्त मिळेल, अशी भीती किरण कोळी यांनी व्यक्त केली.
पावसाळ्यात भरती आणि ओहोटीत प्लास्टिक समुद्रकिनारी वाहून येते. पालिकेचे कंत्राटदार रोज नियमित मढ सिल्व्हर बीच आणि या परिसरातील इतर बीचेस स्वच्छ करतात. - किरण दिघावकर, सहायक आयुक्त, पी उत्तर विभाग