मुंबई : शहरातील कुर्ला-बीकेसी-वांद्रे भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या निविदेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता कंत्राटदारांना २५ जूनपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत.
वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि या भागातील प्रवाशांना जलद प्रवासाचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता ‘एमएमआरडीए’ने वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या निविदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मार्चमध्ये काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी २० मेपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ‘एमएमआरडीए’ने या निविदांना १२ जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा निविदांना मुदतवाढ देण्यात आली आली आहे. या निविदा आता २६ जूनला खुल्या केल्या जाणार आहेत. कंत्राटदारांनी काही प्रश्न उपस्थित केल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
वांद्रे ते कुर्ला या ८.८ किमी अंतरावर ही पॉड टॅक्सी धावणार आहे. वांद्रे-कुर्लादरम्यान प्रवासासाठी प्रवाशांकडून १८४ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी १ हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सार्वजनिक-खासगी-भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दरम्यान, कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, तर कंत्राटदाराला ३० वर्षांसाठी सवलत कालावधी दिला जाणार आहे.