Join us

मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचे दिसताहेत ‘गुड इफेक्टस्’; पेट्रोलिंग, जनजागृतीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:40 AM

कांदिवली येथील समतानगर परिसरात दोन अल्पवयींवर स्थानिकांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फुटली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कांदिवली येथील समतानगर परिसरात दोन अल्पवयींवर स्थानिकांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फुटली. त्याचे खरे श्रेय समतानगर पोलिसांच्या निर्भया पथकाला जाते. 

निर्भया पथकाकडून स्थानिक परिसरात पेट्रोलिंग आणि जनजागृती केली जात होती.  परिणामी, पीडितांच्या पालकांनी पोलिस ठाण्यात जाण्याची हिंमत दाखवली आणि आरोपी गजाआड झाला. त्यामुळे शहरभरात निर्भया पथकामुळे अत्याचारांना वाचा फुटून गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात सापडण्यास मदत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

काय आहे निर्भया पथक?

निर्भया पथक हे मुंबई पोलिसांचे एक युनिट आहे जे महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. ज्या पथकात प्रशिक्षित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

...म्हणून रोमिओगिरी आवरा  

महिला आणि तरुणींची छेडछाड, अश्लील शेरेबाजी, पाठलाग करणे, मोबाइल नंबर मागणे, धमकावणे असे बरेच प्रकार रोडरोमिओंकडून केले जातात. त्यामुळे असे प्रकार केल्याची तक्रार पथकाला मिळाल्यावर या व्यक्तीला पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

पथकाच्या जबाबदाऱ्या -

१) पेट्रोलिंग : महिला, लहान मुले आणि मुलींची छेडछाड रोखण्यासाठी शहरात नियमितपणे गस्त घालणे.

२) इंटेलिजन्स : अनाथाश्रम, वसतिगृहे आणि बालगृहांमधील चुकीच्या कृत्यांवर माहिती गोळा करणे जागरूकता निर्माण करणे.

३) जागरूकता : लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो), कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, पथकाच्या हेल्पलाइन क्रमांक १०३ वर तसेच १००, ११२ वर आलेल्या कॉलला प्रतिसाद देत आहे. गरजूंच्या मदतीसाठी धावणे. 

निर्भयामुळे उघड झालेली प्रकरणे-

१) ऑगस्ट : कांदिवली पूर्वेत दोन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि १३ वर्षांच्या मुलीला अश्लील चाळे करून दाखवणाऱ्या रहीम पठाण (३१) याला समतानगर पोलिसांनी अटक केली. 

२) जुलै : जुहू परिसरात मॉर्निंग वॉक वरून परतणाऱ्या तरुणीला अश्लील चाळे करून दाखवणाऱ्या दिनेश डाकवे (२५) याचा गाशा गुंडाळण्यात आला.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीकांदिवली पूर्वपोलिस