Join us

घर दिले ताब्यात; कागदपत्रे मात्र निघाली चक्क बोगस; तोतया अधिकाऱ्याने घातला १६.५० लाखांना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 9:45 AM

पालिका अधिकारी असल्याचे सांगत कमी दरात घर विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवत एका इलेक्ट्रिशियनला १६.५० लाखांना गंडा घातला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालिका अधिकारी असल्याचे सांगत कमी दरात घर विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवत एका इलेक्ट्रिशियनला १६.५० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसात तक्रार दाखल केली. उल्हास गायकवाड या नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.

राजेंद्रकुमार सरोज हे अदानी इलेक्ट्रिसिटी, चेंबूर येथे काम करतात. त्यांना ४ जानेवारी २०२१ रोजी दोन रूम विकत घ्यायच्या होत्या. याबाबत त्यांनी त्यांच्या घाटकोपरमधील मेहुण्यास सांगितले. त्याच्या ओळखीने सरोज हे गायकवाडच्या संपर्कात आले. गायकवाडने तो पालिका अधिकारी आहे, असे सांगून मानखुर्द परिसरात कमी किमतीत रूम विकत घेऊन देतो, असे सरोज यांना सांगितले. 

जुने कुलूप तोडून नवे कुलूप-

१) रूम खरेदी करण्यासाठी ५० हजारांचे टोकन देत नंतर मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये चार रूमचे अलॉटमेंट लेटर गायकवाडने दिले. सरोज यांनी रूम ताब्यात घेत त्यामध्ये साहित्य ठेवले. तेथे ते २०२१ ते २०२२ पर्यंत वास्तव्यास होते. दरम्यान, मार्च २०२३ मध्ये ते पत्नीसह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. 

२) संध्याकाळी परतल्यावर त्यांचे कुलूप तोडून नवीन कुलूप लावल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी गायकवाडला संपर्क केल्यावर याबाबत तक्रार करू नका, असे त्याने सांगत रूम लवकरच तुमच्या ताब्यात येईल, असेही म्हणाला. मात्र नंतर गायकवाडने सरोज यांना उडवाउडवीची उत्तर दिले. अखेर कागदपत्र घेऊन तक्रारदार यांनी पालिकेच्या मानखुर्दमधील एम/पूर्व विभागाला भेट दिली. 

३) अधिकाऱ्यांनी सदर कागदपत्रे बनावट आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि ४७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबईधोकेबाजीगुन्हेगारीपोलिस