Join us

सहायक आयुक्तांची कमतरता, महापालिकेतील स्थिती; अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:58 AM

पालिकेत सध्या सहायक आयुक्तांच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त असून, अनेक विभागांना पूर्ण वेळ सहायक आयुक्त नाहीत.

मुंबई :  नोकरभरती, पदोन्नती, निवडणुकीच्या कामावर रुजू झालेले; मात्र अजूनही पालिकेच्या सेवेत न परतलेले  कर्मचारी, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा भार असे वातावरण सध्या मुंबई पालिकेच्या मुख्यालयात आणि विभाग कार्यालयात आहे. हे कमी काय म्हणून सहायक आयुक्तांच्या (वॉर्ड ऑफिसर)  जागाही रिकाम्या असल्याने एका सहायक आयुक्ताला दुसऱ्या विभागाचे  काम पाहावे लागत आहे. त्यामुळे सहायक आयुक्त  पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर  कार्यकारी अभियंता व उपप्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविण्याची वेळ  आली आहे. पालिकेत सध्या सहायक आयुक्तांच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त असून, अनेक विभागांना पूर्ण वेळ सहायक आयुक्त नाहीत. अनेक अधिकाऱ्यांच्या बढत्याही रखडल्या आहेत . 

इतर कर्मचाऱ्यांवर ताण-

परिणामी अनेक अधिकाऱ्यांना एकापेक्षा अधिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरचा कामाचा भार  वाढला असून, त्यामुळे विभागातील कामावरही काही प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची नियुक्ती लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. या पदावर बढतीने नियुक्ती दिली जात नाही. महानगरपालिकेत २४ विभाग कार्यालये आहेत. 

१० जुलै रोजी मुलाखती-

लोकसेवा आयोगातर्फे या जागा भरल्या जात नाही तोपर्यंत या जागांवर नियुक्त करण्यासाठी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने कार्यकारी अभियंता व उपप्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत. उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता या पदावर कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असलेल्या, सक्षम व निष्कलंक सेवा असणाऱ्या इच्छुक अधिकाऱ्यांकडून दि. ५ जुलैपर्यंत अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या दि. १० जुलै रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

५० टक्के जागा रिक्त-

१) सहायक आयुक्त पदाच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. एकूण ३५ पदांपैकी केवळ १७ पदे भरलेली आहेत. 

२) उर्वरित १८ पदांपैकी ११ पदांवर कार्यकारी अभियंत्यांना अथवा उपप्रमुख अभियंत्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 

३) सहायक आयुक्तपदी सध्या असलेले काही अधिकारी हे उपायुक्त पदासाठी पात्र झालेले आहेत. 

४) सहायक आयुक्त पदासाठी उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांचीही बढती रखडली आहे. 

५) काही अधिकारी उपायुक्त आणि सहायक आयुक्त अशा दोन्ही पदांचा कार्यभार सांभाळत आहेत.

कर निर्धारण व संकलन, नियोजन खात्यांचे प्रमुख या कार्यालयाचे प्रमुख हे सहायक आयुक्त असतात. कर निर्धारण व संकलन, नियोजन अशा अन्य खात्यांच्या प्रमुखपदीही सहायक आयुक्त असतात. मात्र गेल्या काही वर्षांत सहायक आयुक्तांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिका