लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मॅनहोलमधून निघणारी उग्र दुर्गंधी रोखण्याचा प्रयत्न सध्या घनकचरा विभागाकडून केला जात आहे. यासाठी मॅनहोलजवळ अत्याधुनिक व्हेंट शाफ्ट बसवण्यात येणार आहे. हे व्हेंट शाफ्ट फायबर रिइन्फोर्ड प्लास्टिकचा वापर करून तयार करण्यात आले आहेत. यासाठी हवा गुणवत्ता निधी वापरण्यात येणार आहे.
रस्त्याखाली काही खोलीवर असलेल्या वाहिन्यांतून मलजल वाहून नेले जाते. त्यांचे परीक्षण करण्यासाठी मलवाहिन्यांवर ठरावीक अंतरावर मॅनहोल असतात. मलवाहिन्यांमधील मलजलामुळे निर्माण होणाऱ्या रासायनिक, तसेच इतर प्रक्रियांमुळे हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, अमोनिया, मिथेन, कार्बन डायसल्फाइड यांसारखे विविध दुर्गंधीयुक्त, विषारी वायू निर्माण होत असतात.
सहा महिन्यांत काम पूर्ण होणार-
यासंबंधीचे काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. घनकचरा विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवून अर्ज मागवले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून मे. लिकु-टेक एन्व्हायर्नमेंटल सोल्युशन्स इंडिया प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यावर एक कोटी ३६ लाख १९ हजार १२२ रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल.
व्हेंट शाफ्टद्वारे वायू ठरावीक उंचीवर सोडला जाणार-
मॅनहोल हे विविध आकाराच्या झाकणांच्या सहाय्याने बंद असतात. वायुनिर्मितीची प्रक्रिया दिवसरात्र चालू असते. त्यामुळे मलवाहिनी प्रणालीतील वायुदाबही वाढण्याचा धोका संभवतो. मलजल हे गुरुत्वाकर्षणामुळे कमी खोलीकडून जास्त खोलीच्या दिशेने वाहते. जास्त खोली असलेल्या मलवाहिनीच्या भागात वाढत्या वायुदाबामुळे मलजलाच्या प्रवाहास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून मलवाहिन्यांवर सुनिश्चित ठिकाणी काही ठरावीक अंतरावर मॅनहोलच्या शेजारी व्हेंट शाफ्ट उभारलेले असतात.
मलजलामुळे निर्माण होणारा वायू व्हेंट शाफ्टद्वारे वातावरणात ठरावीक उंचीवर सोडणे शक्य असल्याने वायूचे योग्यरीतीने विसरण होऊन प्रणालीतील वायुदाबाचा समतोलही राखण्यास मदत होते.