Join us

वरळी-शिवडी मार्गिकेतील प्रभादेवी पुलाचा तिढा सुटणार; सुधारित आराखडा मनपाकडे सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:12 AM

वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंबई :वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या पुलाचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या पुलाच्या संरचनेत बदल केला जाणार असून रेल्वेस्थानकावरील पुलाचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी पालिकेकडे पाठविण्यात आला आहे.शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, वांद्रे दिशेला जाता यावे, यासाठी ४.५ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती.  जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ५६ टक्केच काम पूर्ण झाले आहे.

मंजुरी मिळताच काम सुरू होणार-

नवा आराखडा मागील दहा दिवसांपूर्वी मंजुरीसाठी पालिकेकडे पाठविला आहे. पालिकेकडून त्याला मंजुरी मिळताच एमएमआरडीएकडून या पुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, या नव्या आराखड्यामुळे परिसरातील १९ इमारती बाधित होण्यापासून बचावणार आहेत, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पुलाच्या संरचनेत बदल-

१) एमएमआरडीएकडून वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वेस्थानकाच्या भागात दुमजली पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वेमार्गिकेवर एक पूल उभारला जाणार आहे. त्यावरून वरळी शिवडी उन्नत मार्गिका जाईल.

२) यासाठी जगन्नाथ भातणकर मार्गावरील प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूची १३० फूट ते १६० फूट जागेची आवश्यकता होती. मात्र, पुनर्वसनाचा अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध केला होता.

३) या पुनर्वसनावर मोठा खर्च अपेक्षित असल्याने एमएमआरडीएने  इमारती बाधित होऊ नये म्हणून पुलाच्या संरचनेत काही बदल केले आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाप्रभादेवीवरळी