लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :सोशल मीडियावरील रील्ससाठी तरुणींचे व्हिडीओ काढण्याचा प्रँक एका तरुणाच्या भलताच अंगलट आला. एका तरुणीने आरडाओरडा करताच स्थानिकांनी तरुणाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना कांजूरमार्ग येथे घडली आहे.
याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी इरफान अहमद (२३) याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. गुरुवारी रात्री तरुणाला मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले.
अहमद हा दातार कॉलनीत राहतो. गेल्या आठवड्यात तेथे रील्ससाठी मोबाइलवर तरुणींचे व्हिडीओ काढण्याचा प्रँक करत होता. त्यावेळी एका तरुणीने त्याला हटकले. मात्र त्याने न ऐकल्याने तरुणीने आरडाओरडा सुरू केला. यावेळी स्थानिकांनी त्याला मारहाण केली. फक्त प्रँकसाठी व्हिडीओ काढल्याचे दाखवत असल्याचे त्याने सांगितले. मनसे नेते मनोज चव्हाण व तरुणींच्या नातेवाइकांनीही त्याला बेदम मारहाण केली.
न्यायालयीन कोठडी-
अहमदला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.