रस्त्यावर थुंकलास, दंड भर सांगत ATM मागितलं, PIN मिळवला अन् लुटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:11 AM2024-06-22T10:11:28+5:302024-06-22T10:13:57+5:30
याप्रकरणी या कर्मचाऱ्याने जुहू पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिस भामट्यांचा शोध घेत आहे.
मुंबई : क्लीनअप मार्शल असल्याचे भासवत दोघांनी खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्याचे बळजबरीने एटीएम हिसकावत त्याच्या खात्यातून पाच हजार रुपये काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी या कर्मचाऱ्याने जुहू पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याआधारे पोलिस भामट्यांचा शोध घेत आहे.
तक्रारदार संतोष वाघेला (३६) हे सहार-अंधेरी रोडवरील खासगी रुग्णालयात साफसफाईचे काम करतात. ते १९ जूनला कामावरून सुटल्यानंतर सायंकाळी ६:३० च्या सुमारास विलेपार्ले परिसरातून चालत घरी जात होते. सायंकाळी ६:४५ च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना ‘तू रस्त्यावर थुंकलास आहे, तंबाखू खातो का, आम्ही क्लीनअप मार्शल असून, ५०० रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यासाठी आमच्याबरोबर एटीएममध्ये चल, तेथे बँक खात्यातील बॅलेन्स बघून तुला सोडून देऊ,’ असे सांगितले.
कारवाईची धमकी देत घेतला पिन क्रमांक-
१) वाघेला यांना दोघांनी दुचाकीवरून जवळच्याच आयडीबीआय बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये नेले. तेथे दोघांनी त्यांच्याकडे एटीएम कार्डचा पिन क्रमांक विचारला. तो देण्यास त्यांनी नकार देताच त्यांना कारवाईची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पिन क्रमांक सांगताच त्यांनी वाघेला यांच्या बँक खात्यातून पाच हजार रुपये काढून घेतले व एटीएम कार्ड देत पळ काढला.
२) दोन्ही आरोपी हे ३५ ते ४५ वयोगटांतील होते. दोघांनी अंगझडती घेण्याच्या बहाण्याने वाघेला यांच्या खिशात तंबाखूची पुडी सापडल्याचे सांगत त्यांचे एटीएम कार्ड काढून घेतले, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.
३) याप्रकरणी वाघेला यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली.