लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना चालक आणि वाहकांबाबत काही तक्रार असल्यास आता थेट आगार प्रमुखांना संपर्क करता येणार आहे. एसटी बसचालकाच्या मागील बाजूस आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आता एसटीतून प्रवास करताना काही अडचणी आल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येणार आहे.
एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामारे जावे लागते. बसचालक, वाहकांबाबतही प्रवाशांच्या तक्रारी असतात; पण त्याची नेमकी दाद घेणार तरी कोण? असा प्रश्न प्रवाशांना वारंवार सतावत असतो. अनेकदा सुजाण प्रवासी स्थानक प्रबंधकांपुढे तक्रारींचा पाढा वाचतात. त्यावेळी त्यांच्या तक्रारींचे निरसन केले जाते; पण सर्व प्रवाशांना तत्काळ तक्रार करता यावी, यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान अडचण आल्यास थेट तिथे प्रदर्शित केलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपल्या अडचणी अथवा समस्येचे निवारण तातडीने करून घेता येणार आहे.
या कारणांसाठी तुम्ही करू शकता तक्रार -
१) बस अतिवेगाने चालवणे.
२) बस चालवताना मोबाइलवर बोलणे.
३) एसटी वाहकाचे प्रवाशांना उद्धटपणे वागणे.
४) योग्य ठिकाणी न उतरवणे.