लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :पाणीपुरवठ्याबाबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, पाण्याविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा, असे निर्देश मुंबई आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण आणि आर उत्तर विभागातील पाणीपुरवठ्याचा गगराणी यांनी बुधवारी आढावा घेतला. यावेळी बोरिवली, कांदिवली येथील रहिवाशांना अखंड, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करा, ज्या ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत, त्यांचे तत्काळ निरसन करा. जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढा, त्याकरिता आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करा, असे निर्देशही त्यांनी दिले. चारकोप, देवीपाडा आणि एक्सर परिसराला होणारा येथील दूषित पाणीपुरवठा थांबल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
बोरिवली, कांदिवली या परिसराला आयुक्तांनी भेट देत विविध विकासकामांचीदेखील पाहणी केली. प्रारंभी कांदिवली (पश्चिम) येथील आर दक्षिण विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी पाणीपुरवठा, वाहतूक व प्रकल्पबाधित नागरिकांचे पुनर्वसन या विषयांवर अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर बोरिवली पूर्वेतील राजेंद्र नगर उड्डाणपूल, कांदिवली पूर्वेतील क्षमता बांधणी केंद्र, प्रस्तावित नागरी सुविधा केंद्राची पाहणी करीत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले.
उपायुक्त, सहायक आयुक्तांची उपस्थिती-
यावेळी परिमंडळ ७ च्या उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर मध्य विभागाचे सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, आर उत्तर विभागाचे सहायक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर, नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर, आदी उपस्थित होत्या.
निर्देशांची अंमलबाजवणी-
१) रस्ते बाधित, प्रकल्पबाधित नागरिकांचे आहे त्याच विभागात, परिमंडळात पुनर्वसन करावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. घरकुलांची उपलब्धता आणि बाधितांची संख्या यांची सविस्तर माहिती घ्यावी, असे निर्देशही आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.
२) या बैठकीनंतर गगराणी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत राजेंद्र नगर उड्डाणपुलास भेट देऊन नियोजित जोड रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर, कांदिवली पूर्वेतील आकुर्ली छेद रस्ता येथील क्षमता बांधणी केंद्र, अशोक चक्रवती मार्गावरील प्रस्तावित नागरी सुविधा केंद्र, आदींचीही पाहणी केली.