लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत मालमत्तांच्या खरेदीचा जोर कायम असून, ऑगस्टमध्ये ११ हजार ७३५ मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले आहेत. याद्वारे राज्य सरकारला एक हजार ७२ रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत मालमत्तांच्या खरेदीत झालेली ही वाढ आठ टक्के अधिक आहे. तर, महसुलात झालेली ही वाढ ३२ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या मालमत्तेच्या व्यवहारांच्या माध्यमातून राज्य सरकारला ८१० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
१) २०२४ मध्ये आतापर्यंत ९६ हजार ६०१ मालमत्तांची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांच्या तुलनेत ही वाढ १६ टक्के अधिक आहे.
२) गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण ८३ हजार ६१५ मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार झाले होते.
३) तर, गेल्या आठ महिन्यांत झालेल्या मालमत्ता खरेदीमुळे राज्य सरकारला आतापर्यंत आठ हजार १० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
ऑगस्टमध्ये झालेल्या मालमत्तांच्या खरेदी व्यवहारांत ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे आहे, तर उर्वरित २० टक्के प्रमाण हे व्यावसायिक मालमत्तांचे आहे. चालू वर्षात ५०० ते एक हजार चौरस फूट आकारमानाचे घर घेण्याकडे प्रामुख्याने नागरिकांचा कल असल्याचे दिसून आले आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या व्यवहारांत ५०० ते एक हजार चौरस फूट आकारमानाच्या घरांच्या खरेदीचे प्रमाणे हे ४९ टक्के इतके नोंदवले गेले आहे. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या खरेदीचे प्रमाण हे ३३ टक्के इतके राहिलेले आहे. टू-बीएच-के, थ्री-बीच-के आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या आलिशान घरांच्या खरेदीचा ट्रेन्ड ऑगस्ट महिन्यातही कायम राहिलेला आहे.
गणेशोत्सव, सणासुदीत विक्रीत वाढीची अपेक्षा-
१) चालू वर्षात आतापर्यंत एका महिन्यात सर्वाधिक मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार हे जूनमध्ये नोंदवले गेले होते.
२) जूनमध्ये १२ हजार ३७३ मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार झाले होते. त्या तुलनेत ऑगस्टमधील व्यवहारांत काही प्रमाणात घट नोंदवली गेली आहे.
३) आगामी काळात असलेला गणेशोत्सव आणि अन्य सणासुदीच्या कालावधीमध्ये मुंबईतील घरांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.