मालवणी येथील 'मुंबई पब्लिक स्कूल'मध्ये आता मिळणार दहावीपर्यंतचे शिक्षण!
By मनोहर कुंभेजकर | Published: June 26, 2023 05:30 PM2023-06-26T17:30:21+5:302023-06-26T17:30:49+5:30
मुलांना शाळा बदलावी लागू नये, त्यांना या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण मिळावे यासाठी वर्गांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून सातत्याने करण्यात येत होती.
मुंबई:-मालाड पश्चिम मालवणी येथे याआधी 'मुंबई पब्लिक शाळे'मध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागे. दरवर्षी या शांळेतून ३०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. मात्र पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थिती आणि शाळा दूर असल्याने मुले शिक्षणापासून वंचित राहावे लागे.
मुलांना शाळा बदलावी लागू नये, त्यांना या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण मिळावे यासाठी वर्गांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून सातत्याने करण्यात येत होती.
देशाच्या प्रगतीचा मार्ग शिक्षण क्षेत्रातूनच जातो. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उच्च असणे आवश्यक आहे. मुलांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी या दिशेने नेहमीच सकारात्मक प्रयत्न केले आहेत ; असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार अस्लम शेख यांनी केले. मालवणी येथील "मुंबई पब्लिक शाळेला" आमदार अस्लम शेख यांच्या प्रयत्नांतून नुकतीच दहावी पर्यंत मान्यता मिळाली. नवीन वर्गखोल्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शेख पुढे म्हणाले की, आपण ज्या विभागाचे प्रतिनिधीत्त्व करतो, त्या विभागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत की नाही हे पाहणं प्रत्येक लोकप्रनिधीचं कर्तव्य असतं. कारण आजचे विद्यार्थीच पुढे जाऊन देशाचे भवितव्य घडवणारे असतात. त्यामुळे मतदार संघात उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा असाव्यात यादृष्टीने मी नेहमीच प्रयत्नशील असतो.
शाळेमध्ये दहावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आता शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही व नजीकच्या परिसरात त्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मनापा पी/ उत्तर विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (शिक्षण), निशा यादव, शाळेच्या मुख्याध्यापिका फरीदा उस्मानी व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.