व्यावसायिक कार्यालयांच्या खरेदी जोरात; ६ महिन्यांत ३ कोटी चौरस फुटांवर थाटली कार्यालये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 10:59 AM2024-07-06T10:59:09+5:302024-07-06T11:06:29+5:30

मुंबईसह देशात गेल्या दीड वर्षापासून एकीकडे घरांची खरेदी जोमाने होत असतानाच आता दुसरीकडे कार्यालयांची खरेदीही जोमाने होत असल्याचे चित्र आहे.

in mumbai purchase in commercial offices increased 3 crore square feet of offices built in 6 months | व्यावसायिक कार्यालयांच्या खरेदी जोरात; ६ महिन्यांत ३ कोटी चौरस फुटांवर थाटली कार्यालये

व्यावसायिक कार्यालयांच्या खरेदी जोरात; ६ महिन्यांत ३ कोटी चौरस फुटांवर थाटली कार्यालये

मुंबई :मुंबईसह देशात गेल्या दीड वर्षापासून एकीकडे घरांची खरेदी जोमाने होत असतानाच आता दुसरीकडे कार्यालयांची खरेदीही जोमाने होत असल्याचे चित्र आहे. बांधकाम क्षेत्रातील एका सर्वेक्षण कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत देशातील विविध शहरांत मिळून एकूण तीन कोटी चौरस फुटांपेक्षा जास्त जागेवर विविध कंपन्यांनी कार्यालये थाटल्याची माहिती पुढे आली आहे. 

मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद यासह देशांतील प्रमुख शहरांतून अनेक कंपन्यांनी आपला विस्तार केला आहे. बहुतांश कंपन्यांचा मुंबई व दिल्ली शहर वगळता अन्य ठिकाणी कार्यालयांच्या खरेदीकडे कंपन्यांचा कल आहे. तर, मुंबई व दिल्लीतील प्रति चौरस फूट जागांचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक कंपन्यांनी भाड्याने कार्यालये घेतली आहेत.

कोविडनंतर परिस्थितीत बदल-

१) कोविडच्या काळात लॉकडाउनमुळे बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा दिली होती. 

२) आता कोविडची साथ संपुष्टात येताच अनेक कंपन्यांनी घरून आणि ऑफिसमधून अशा हायब्रीड मॉडेलचीदेखील मांडणी केली. 

३) आता मात्र पुन्हा कंपन्यांनी कार्यालये पूर्णपणे सुरू करून तेथूनच काम करण्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

आकडे काय सांगतात ?

जानेवारी ते जून या कालावधीमध्ये देशामध्ये एकूण तीन कोटी ३५ लाख चौरस फूट जागेवर नव्या कार्यालयांची मांडणी झाली आहे. यापूर्वी २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यांत देशात विक्रमी तीन कोटी ७१ हजार चौरस फूट जागेवर नवी कार्यालये सुरू झाली होती. २०१९ नंतर प्रथमच विक्रमी प्रमाणावर कार्यालयांची मांडणी झाली आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा झालेली वाढ २९ टक्के अधिक आहे. 

बॉलीवूडमधील कलाकारांकडूनही खरेदी-

गेल्या दीड वर्षात बॉलीवूड कलाकारांनी मुंबईत ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तांची खरेदी केली आहे. यात विशेष म्हणजे २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी ही कार्यालयांची केली आहे. 

बिग-बी अमिताभ यांनी मुंबईतील एका इमारतीमध्ये चारपेक्षा जास्त कार्यालयांची खरेदी केली आहे, तर याच इमारतीमध्ये अलीकडेच अभिनेत्री काजोल हिने १९४ चौरस मीटर आकाराचे आलिशान कार्यालय खरेदी केली आहे. याकरिता काजोलने ७ कोटी ६४ लाख रुपये मोजल्याची माहिती आहे. काजोलचा पती व अभिनेता अजय देवगण यानेदेखील याच इमारतीमध्ये ४५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात पाच कार्यालयांची खरेदी केली आहे. याच इमारतीमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन याने २,१०० चौरस फुटांच्या कार्यालयाची खरेदी १० कोटी रुपयांना केल्याची माहिती आहे. 

साधारणपणे तेवढ्याच आकाराच्या कार्यालयासाठी त्याच इमारतीमध्ये अभिनेत्री सारा अली खान हिने तिची आई व अभिनेत्री अमृता सिंग यांनी नऊ कोटी रुपये मोजत एका कार्यालयाची खरेदी केली आहे.

Web Title: in mumbai purchase in commercial offices increased 3 crore square feet of offices built in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.