Join us

रेल्वेचे सरकते जिने, लिफ्ट बंद पडल्यावर तातडीने होणार दुरूस्त; ‘परे’ची मॉनिटरिंग सिस्टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:01 AM

लिफ्ट आणि एस्केलेटर सुरळीत चालण्यासाठी आणि देखभालीसाठी, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

मुंबई :पश्चिम रेल्वेकडून नव्याने वापरण्यात येणाऱ्या वेब आधारित जीएसएम अलर्ट मॉनिटरिंग सिस्टीममुळे एस्केलेटर तसेच लिफ्ट बंद राहण्याची समस्या निकाली निघणार आहे. लिफ्ट आणि एस्केलेटर सुरळीत चालण्यासाठी आणि देखभालीसाठी, पश्चिम रेल्वेच्यामुंबई विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. वेब आधारित मॉनिटरिंग सिस्टीम विकसित केली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या, विशेषतः वृद्ध आणि अपंगांच्या सोयीसाठी मुंबई मध्य विभागातील विविध स्थानकांवर ६९ लिफ्ट आणि १२२ एस्केलेटर कार्यरत आहेत. मात्र, एस्केलेटर किंवा लिफ्ट सतत बंद पडत असल्याने प्रवाशांना अडचणी येतात.  बरेचवेळा इमर्जन्सी स्टॉप बटण दाबल्यानंतर एस्केलेटर काम करणे बंद करतात आणि त्याची दुरुस्ती होईपर्यंत बंदच राहतात. मात्र प्रत्येक एस्केलेटर आणि लिफ्टसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमणे परवडणारे नाही.

त्यामुळे, अशा परिस्थितीत त्वरित माहिती मिळण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी, पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाने एस्केलेटर आणि लिफ्टसाठी वेब आधारित जीएसएम अलर्ट मॉनिटरिंग सिस्टीम विकसित केली आहे. याशिवाय, एक मोबाइल अप्लिकेशनदेखील विकसित केले गेले आहे, जे लिफ्ट आणि एस्केलेटर काम करत नसल्याच्या बाबतीत त्वरित सूचना देते. एस्केलेटर आणि लिफ्ट या दोन्ही ठिकाणी ही मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात त्वरित काम होण्यास मदत होईल, अशी माहिती अभिषेक यांनी दिली. 

अशी काम करणार यंत्रणा...

१) मोबाइल ॲप किंवा वेब ॲपवर ऑडिओ-व्हिज्युअल अलार्म मिळत असल्याने कर्मचारी तातडीने बिघडलेल्या एस्केलेटरच्या दुरुस्तीसाठी जाऊ शकतात आणि दुरुस्तीनंतर तशी सूचना एस्केलेटर आणि लिफ्टच्या रेकॉर्ड सर्व्हरवर सेव्ह केली जाते. 

२) एस्केलेटर आणि लिफ्टची दुरुस्ती करण्यासाठीच्या शेवटच्या तारखेची सूचना ही सिस्टीम अलर्टद्वारे देते. गेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात ९ लिफ्ट सुरू झाल्याची माहिती अभिषेक यांनी दिली. 

३) भाईंदर, नायगाव आणि वसई रोड येथे प्रत्येकी दोन तर सांताक्रूझ, बोरिवली आणि डहाणू रोड येथे प्रत्येकी एक लिफ्ट सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खार रोड आणि वसई रोड येथे प्रत्येकी दोन तर भाईंदर आणि नायगाव येथे प्रत्येकी एक अशा सहा एस्केलेटर सुरू करण्यात आले आहेत.

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे