विक्रोळी पुलाला पावसाचा ब्रेक; पश्चिमेकडील रस्त्यांची कामे, अनधिकृत दुकानांमुळे विलंब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:58 AM2024-06-14T10:58:27+5:302024-06-14T11:01:35+5:30
गेली पाच वर्षे संथगतीने काम सुरू असणाऱ्या विक्रोळी उड्डाणपुलाच्या कामाला आता पावसाळ्यानंतरच गती मिळणार आहे.
मुंबई : गेली पाच वर्षे संथगतीने काम सुरू असणाऱ्या विक्रोळी उड्डाणपुलाच्या कामाला आता पावसाळ्यानंतरच गती मिळणार आहे. विक्रोळीच्या पूर्व भागातील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत, मात्र पश्चिमेकडील भागात रस्त्यांची काही कामे बाकी आहेत, शिवाय रेल्वे हद्दीतही काही कामे बाकी आहेत.
विक्रोळी पूर्व आणि पश्चिम भाग; एका अर्थाने पूर्व द्रुतगती महामार्ग आणि एल.बी.एस. रोड जोडण्यात हा पूल महत्वाची भूमिका बजावणार आहे. २०१२ साली या पुलाची आखणी करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात पुलाचे बांधकाम सुरू व्हायला २०१८ साल उजाडावे लागले. दोन वर्षे काम सुरू झाले. त्यानंतर कोरोना काळात काम पुन्हा ठप्प पडले. त्यानंतर कामाला बऱ्यापैकी गती मिळाली. पूर्वेकडील भागात काम करण्यास फार अडचण नाही.
१) पश्चिमेकडील भागात रस्त्यांची कामे, झाडांचे पुनर्रोपण, अनधिकृत दुकानांचा प्रश्न, आदी कारणांमुळे या भागात काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
२) रेल्वेच्या हद्दीत गर्डर टाकण्यात आला असून, आता आणखी एका गर्डरचे काम शिल्लक आहे.
३) पुलाचे एकूण काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पालिकेच्या हद्दीतील ७५ टक्के काम मार्गी लागले आहे. पालिका आणि रेल्वे संयुक्तपणे पुलाची उभारणी करत आहे.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणास अडथळा-
या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे पूर्वेकडील भागात बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पूर्वद्रुतगती महामार्ग ते विक्रोळी स्थानक पूर्व या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पुलाचे काम सुरू असल्याने सध्या तरी रस्ता काँक्रीटचा करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
पुलामुळे नागरिकांचा त्रास वाचणार-
विक्रोळी भागात पूर्वी रेल्वे फाटक होते. त्यामुळे वाहनांना पूर्व-पश्चिम दिशेने जाता येत असे. अपघातांमुळे फाटक बंद झाल्याने पुलाची निकड निर्माण झाली. पूल नसल्याने पूर्व द्रुतगती महामार्गावरून एल.बी.एस. मार्गावर जायचे झाल्यास एकतर घाटकोपर किंवा पवई गांधीनगर असा चार किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. पुलामुळे हा त्रास वाचणार आहे.