‘जोर’धारांनी मुंबईकरांची कोंडी, दुपारपर्यंत भरली होती धडकी; संध्याकाळनंतर मात्र जोर कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 09:41 AM2024-07-26T09:41:21+5:302024-07-26T09:43:20+5:30
विशेषत: सखल भागांत साचलेल्या पाण्यासह रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले असतानाच दुपारी रेड अलर्ट जारी करण्यात आला.
मुंबई :मुंबईत पहाटे चारपासूनच सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईकरांचे अक्षरश: हाल केले. विशेषत: सखल भागांत साचलेल्या पाण्यासह रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले असतानाच दुपारी रेड अलर्ट जारी करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ उडाली. सकाळपासून पाऊस सुरू असल्याने महत्त्वाची कामे नसलेल्या मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले. रेल्वे आणि रस्ते वाहतूक धीमी झाल्याने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी यंत्रणांच्या नावाने बोटे मोडली.
गुरुवारी भल्या पहाटे पावसाने जोर पकडला होता. विशेषत: सकाळी ८ नंतर सुरू झालेला पाऊस दहा वाजेपर्यंत कोसळत होता. काहीसा ब्रेक घेतल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पावसाने मारा सुरूच ठेवला होता. विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. दुपारी जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टनंतर विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडाली. सकाळी १० वाजेपासून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत पडलेला पाऊस मुंबईकरांना धडकी भरवत होता. दुपारनंतर सायंकाळपर्यंत मात्र पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.
१) मुंबईत आतापर्यंत एकूण सरासरी २ हजार ५४७ मिमी पाऊस झाला आहे. ही टक्केवारी ६९ आहे.
२) मुंबई शहरात आतापर्यंत ७४ तर उपनगरात ६४ टक्के पाऊस पडला आहे.
३) कुलाबा वेधशाळेत १ हजार ८१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
४) सांताक्रूझ वेधशाळेत १ हजार ९१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
५) कुलाबा येथील पावसाची टक्केवारी ७४ तर सांताक्रूझ येथील टक्केवारी ७३ आहे.
पाण्याचा संथ गतीने निचरा-
कुर्ला रेल्वे स्थानक, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, शेल कॉलनी, कुर्ला डेपो, अंधेरी सब वे, अंधेरी मार्केट, बीकेसीमधील लायब्ररी जंक्शन, वीरा देसाई रोड येथे पाण्याचा संथ गतीने निचरा होत होता. येथे मनुष्यबळ आणि पंपच्या सहाय्याने तसेच मॅनहोल्सची झाकणे उघडून पाण्याचा निचरा केला जात होता.
२६ जुलै रोजी दुपारी ३.३२ वाजता समुद्राला भरती आहे. या काळात ४.४६ मीटर उंचीच्या लाटा उसळतील.
शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडेल. ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील.
२५ जुलै : सकाळी ८ पर्यंतचा पाऊस-
१) कुलाबा ६२ मिमी
२) सांताक्रूझ ६८ मिमी
३) शहर ४३ मिमी
४) पूर्व उपनगर ८९ मिमी
५) पश्चिम उपनगर ८७ मिमी
बेस्टच्या मार्गात बदल-
१) मुंबईत पावसाचा जोर कायम असल्याने शेल कॉलनी, कुर्ला येथील शीतल सिनेमा, आरे कॉलनीमध्ये बेस्ट बसचे मार्ग वळविण्यात आले.
२) ४६ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या.
३) ६ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले.
४) ८ ठिकाणी बांधकामे कोसळली.