डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:15 AM2024-08-10T10:15:56+5:302024-08-10T10:19:07+5:30
राणीच्या बागेत पेंग्विन, मगरी, वाघ, बिबटे, तसेच विविधरंगांचे पक्षी दाखल झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) येथे २०१७ मध्ये दाखल झालेले हम्बोल्ट पेंग्विन बच्चे कंपनीसह मोठ्यांचे आकर्षण ठरले आहेत. दक्षिण कोरिया येथून मुंबईत आणलेल्या या पेंग्विन्सची विशेष काळजी घ्यावी लागते. सध्या येथे १८ हम्बोल्ट पेंग्विन्स असून, त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्थापनासाठी, तसेच त्यांच्या प्रदर्शनीतील आवश्यक वातावरण उपलब्धता, देखभालीसाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरिता यंदाही जवळपास १५ कोटींहून अधिक खर्च येण्याची शक्यता आहे.
राणीच्या बागेत पेंग्विन, मगरी, वाघ, बिबटे, तसेच विविधरंगांचे पक्षी दाखल झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तरीही पर्यटकांचे मुख्य आकर्षण पेंग्विन कक्ष ठरत आहेत.
आचारसंहितेमुळे आधीच प्रकिया-
राणीची बाग फक्त मुंबईतीलच नव्हे, तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. यातील पेंग्विन कक्षाच्या देखभालीच्या व्यवस्थापनाची मुदत येत्या नोव्हेंबरमध्ये संपत आहे. आगामी विधानसभा व महापालिका निवडणुका लक्षात घेता आचारसंहितेचा अडथळा होऊन प्रक्रियेला उशीर होऊ नये म्हणून पालिकेकडून निविदा प्रक्रिया चार महिने आधीच सुरू करण्यात आली आहे.
कोरियावरून येथे आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. गेल्या काही वर्षांत हे परदेशी पाहुणे भारतीय वातावरणात चांगलेच रुळले असून, त्यांची संख्याही १८ वर पोहोचली आहे. पेंग्विनची धमाल मस्तीची बच्चे कंपनीसह लहान -मोठ्यांना भुरळ पाडत आहे. दरम्यान, या पेंग्विनच्या आरोग्याची व त्यांच्या प्रदर्शनीच्या देखभालीची अधिक काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.
पेंग्विन्सचा खर्च मोठा-
१) राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विनसाठी विशेष वातानुकूलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विन खरेदीसाठी आणि या कक्षासाठी सुरुवातीला २५ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर मागील दोन वेळा प्रत्येकी तीन वर्षांच्या देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे.
२) पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकूलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी यंदा निविदा काढण्यात आली आहे.
३) पेंग्विनच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर नेमले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लिमेंटस् दिले जातात. दरम्यान, मागील वेळी या निविदेला विरोधकांनी मोठा विरोध दर्शवला होता.