Join us  

यारी रोड ते लोखंडवाला अंतर गाठा पाच मिनिटांत; पूल बांधण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 10:28 AM

गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या अंधेरी पश्चिमेतील यारी रोड ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स दरम्यानचा पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या अंधेरी पश्चिमेतील यारी रोड ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स दरम्यानचा पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. याबाबतची सूचना गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे अंधेरी यारी रोड ते लोखंडवाला पुलावरून ४५ मिनिटांचा प्रवास फक्त पाच मिनिटांत करणे शक्य होणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी महापालिका ४५ कोटी रुपये खर्च करणार आहे. या पुलामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. अंधेरी पश्चिमेतील यारी रोड ते लोखंडवाला दरम्यान अमरनाथ टॉवर बिल्डिंगजवळ वाहनांना ये-जा करण्यासाठी पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पुलाचा प्रकल्प २००२ पासून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २०१२ मध्ये या प्रकल्पासाठी निविदाही काढण्यात आली होती. लोखंडवाला परिसराला यारी रोडपासून खाडीने वेगळे केले आहे आणि या दोन ठिकाणांमध्ये थेट संपर्क नसल्याने वाहनचालकांना चार आणि सात बंगल्यांतून वळसा घालून जावे लागते. 

आता लागतात ४५ मिनिटे-

१) सध्या रहदारीच्या वेळी ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागतो. मात्र आता नव्या पुलामुळे हे अंतर अवघ्या पाच मिनिटांत कापले जाणार असल्याचे पूल विभागाकडून सांगण्यात आले. 

खर्च वाढता वाढता वाढे-

यारी रोड ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सदरम्यान बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे खारफुटीवर परिणाम होणार असल्याचे सांगत न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे हा पूल रखडला होता. या पार्श्वभूमीवर पुलाच्या बांधकाम रचनेत आवश्यक बदल केल्यामुळे आता पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने मंजुरी दिल्याने पुलाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, पालिकेकडून सांगण्यात आले. सुरुवातीला यासाठी १४ कोटींचा खर्च येणार होता. मात्र आता त्यासाठी ४५ कोटी खर्च करण्यात येणार आहे.

वेळ, इंधनात होणार बचत-

१) पूल बांधण्यात येणारी खाडी सुमारे १०० मीटर रुंद आहे. पुलाचा प्रस्तावित रोड सुमारे १६० मीटरचा असणार आहे.

२) हा पूल खाडीच्या दोन टोकांना जोडणारा असेल. या प्रकल्पात वाहतुकीसाठी दोन कॉजवे असतील.

३) या पुलामुळे सध्या होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून वेळ, इंधन वाचणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरीरस्ते वाहतूक