मुंबई :मुंबईतीलरेल्वे मार्गांवरील विविध पुलांची कामे सुरू असतानाच आता करी रोड, माटुंगा येथील रेल्वे हद्दीतील आणि महालक्ष्मी या पुलांच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला महापालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) च्या अधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल.
रेल्वेमार्गांवरील पूल बांधणीच्या कामात पालिका व महारेल यांच्यात समन्वय असावा, जेणेकरून या कामांदरम्यान नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर, उपप्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक (व्यवसाय विकास आणि वित्त) सुभाष कवडे, व्यवस्थापक (नियोजन) जितेंद्र कुमार, असीतकुमार राऊत, श्रीरामगिरी श्रीकांत उपस्थित होते.
रे रोड पूल ७७% काम पूर्ण - नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट.
भायखळा पूल ४२% काम पूर्ण- हा पूल ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुला करण्याचे लक्ष्य.
घाटकोपर पूल - १४% काम पूर्ण.
टिळक पूल- ८% काम पूर्ण.
वेगाने व नियोजित वेळेत पूर्ण करा-
रेल्वेमार्गांवरील पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च पालिकेकडून केला जातो. तर, प्रत्यक्ष पूल उभारणी महारेलतर्फे करण्यात येत आहे. या बैठकीत रे रोड, भायखळा, दादर येथील टिळक पूल आणि घाटकोपर येथील पुलांच्या कामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. पुलांची कामे वेगाने व नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे आदेश बांगर यांनी यावेळी दिले.
पुनरावलोकनानंतर पुलांची पुनर्बांधणी-
१) माझगाव येथील ऑलिवंट पूल, आर्थर पूल, भायखळा येथील एस पूल सध्या सुस्थितीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता नाही, असे मध्य रेल्वेने २४ एप्रिल २०२४ रोजी पालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
२) रेल्वेकडून १० ते १५ वर्षांनंतर या पुलांच्या पुनर्बांधणीबाबत पुनरावलोकन करण्यात येईल. तूर्तास या पुलांचे कोणतेही काम केले जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.