Join us  

राणीच्या बागेत मे महिन्यात पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी; ३ लाख जणांनी दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 9:56 AM

२०२४ मधील या बागेतील ही पहिली रेकॉर्डब्रेक गर्दी ठरली असून, पालिका प्रशासनाला एक कोटीहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

मुंबई :मुंबईतील आबालवृद्धांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला (राणीची बाग) मे महिन्याच्या सुटीत तीन लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. २०२४ मधील या बागेतील ही पहिली रेकॉर्डब्रेक गर्दी ठरली असून, पालिका प्रशासनाला एक कोटीहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

 कोरोना व टाळेबंदीमुळे बराच काळ राणीची बाग बंद होती. या बागेचे नूतनीकरण करून येथे विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. या बागेत २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत. त्यामुळे या बागेला मुंबईतीलच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. दररोज ६ ते ७ हजार पर्यटक या बागेत येतात. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचते.

ऑनलाइन बुकिंगला पसंती-

१) सध्या या बागेत प्रवेशासाठी लहान मुलांना २५ रुपये, प्रौढांना ५० रुपये तर कौटुंबिक सहलींना एकत्रित १०० रुपये असे शुल्क आहे. प्राण्यांच्या विविध आकर्षणामुळे पर्यटक संख्या आणि महसूल दोन्हींमध्ये वाढ होत आहे.

२) सुटीच्या दिवशी पर्यटक राणीची बाग पाहण्यासाठी येत आहेत. विशेष करून सणांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांना घेऊन मुंबईकर येथे येत आहेत. ऑनलाइन बुकिंगला पर्यटक अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पेंग्विन, वाघ, अस्वल, हरणे आकर्षण-

कोविड पूर्वकाळात या बागेत केवळ पेंग्विन हेच एक आकर्षण होते. मात्र आता 'शक्ती', 'करिश्मा' ही वाघाची जोडी, अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळत आहेत. सध्या येथे १२ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाराणी बगीचा