मुंबई :मुंबईविद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान-तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान आंतरविद्याशाखीय आणि चार या शाखांमधील अधिष्ठाता पदांची दोन ते अडीच वर्षांपासून भरती झाली नव्हती. मात्र, आता या चार विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांसह एकूण १५२ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना ७ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. पदभरती न झाल्यामुळे काही प्राध्यापकांकडे तात्पुरता पदभार सोपवण्यात आला होता.
असा भरा अर्ज-
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करायचे आहेत. पदांचा तपशील, पात्रता, अनुभव, नियम-अटींची माहिती विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली.
अनुदानित तत्त्वावर होणार भरती-
१) विद्यापीठातील १५२ पदांसाठीच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
२) या पदांमध्ये विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी चार, प्राध्यापक पदांसाठी २१, सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल पदांसाठी ५४ आणि सहायक प्राध्यापक-सहाय्यक ग्रंथपालपदांसाठीच्या ७३ जागांचा समावेश आहे.
३) ही सर्व पदे अनुदानित तत्त्वावर भरली जाणार आहेत. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता पदांसाठी याआधीही २२ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
४) अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागणार आहेत.