Join us  

कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती; डीएड, बीएड उमेदवारांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:40 AM

राज्यातील दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील दहा आणि दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये आता कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर बेरोजगार डीएड, बीएड अर्हताधारकांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. यापूर्वी ५ सप्टेंबरला घेतलेल्या निर्णयानुसार निवृत्त शिक्षकाची नियुक्ती करण्यावरून बेरोजगार डीएड, बीएड अर्हताधारक उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयानंतर बेरोजगार उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

नियुक्त शिक्षकाला द्यावे लागणार हमीपत्र-

कंत्राटी तत्त्वावर नियुक्त शिक्षकाला नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षक पदाचे काम पूर्ण करण्यासाठी हमीपत्र घेतले जाणार आहे. नियमित शिक्षकांप्रमाणे अध्यापनाचे तास असणार आहेत. जिल्हास्तरावर उमेदवारांमधून अर्ज मागवून नियुक्ती केली जाणार आहे.

शाळेची पटसंख्या १० पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेले सेवानिवृत्त शिक्षक व डी. एड. व बीएड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांच्या नियुक्तीनंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल, 

दरमहा १५ हजार मानधन-

१) कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या १५ हजारांपर्यंत आहे. अशा शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. दर महिना १५ हजार रुपये मानधनावर नियुक्ती केली जाणार आहे. डीएड, बीएड अर्हताधारकांमधून निवडलेल्या उमेदवाराला सेवा समावेशाचे, सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल. २) त्याशिवाय, ही नियुक्ती एक वर्षासाठी असेल आणि योग्यता व गुणवत्तेच्या आधारावर नियुक्तीचे नूतनीकरण करण्यात येईल. 

टॅग्स :मुंबईशिक्षकनोकरी