Join us  

कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारण्यास सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून नकार; स्थानिकांचाही विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 10:50 AM

कोस्टल रोडलगत ब्रीच कँडी येथील टाटा गार्डन आणि हाजी अली जवळील लाला लजपतराय पार्क या ठिकाणी चार होर्डिंग उभारण्याचा पालिकेचा विचार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारून महसूल मिळवण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न असला तरी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने पालिकेचा तो प्रस्ताव फेटाळल्याचे संकेत आता मिळत आहेत. 

यासंबंधित काही कागदपत्रे आणि नकाशे पालिकेने सादर केलेले नाहीत, तसेच किनाऱ्यावर भराव टाकून निर्माण केलेल्या क्षेत्राचा व्यावसायिक वा महसूल मिळवणाऱ्या बांधकामासाठी वापर करता येत नाही, असे पालिकेला सांगण्यात आले आहे. त्यामुळे होर्डिंगबाबत परवानगी मिळणे अवघड असले तरी पालिका पुढील बैठकीत त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोस्टल रोडलगत ब्रीच कँडी येथील टाटा गार्डन आणि हाजी अली जवळील लाला लजपतराय पार्क या ठिकाणी चार होर्डिंग उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. मात्र, सागरी किनारा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी प्राधिकरणाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत पालिकेने संबंधित कागदपत्रे प्राधिकरणाकडे सादर करणे आवश्यक होते. मात्र ती सादर करण्यात आली नाहीत. त्यातच येथे होर्डिंग उभारण्यास दक्षिण मुंबईतील रहिवाशांसह उद्धवसेनेनेही विरोध केला आहे.

दुसऱ्या बाजूला माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी होर्डिंग उभारण्याचा प्रस्ताव थांबवावा, अशी विनंती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली आहे. होर्डिंग उभारली जाणारी जागा ही समुद्र किनारा क्षेत्रात आहे. या ठिकाणी वारे वेगाने वाहतात. 

वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास होर्डिंग कमकुवत होऊन दुर्घटना होऊ शकते, असे त्यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यापूर्वी वांद्रे प्रोमेनेड येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला होर्डिंग उभारण्यासदेखील स्थानिकांनी विरोध केला होता.

स्था. स्व. संस्थांना महसूल वाढीचा अधिकार प्राधिकरणाने परवानगी नाकारली असली तरी मोकळ्या जागांबद्दल पालिकेचे मत वेगळे आहे. स्थानिक स्वराज संस्था, राज्य आणि केंद्र सरकार यांच्या मालकीच्या मोकळ्या जागांचा वापर महसूल वाढीसाठी करण्याचा अधिकार संबंधित यंत्रणांना आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिका