मुंबई : राज्यातील एक हजार ७५० गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी महारेराने स्थगित केली असून, आणखी एक हजार १३७ प्रकल्पांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्थगित केलेल्या प्रकल्पांत मुंबई महानगर प्रदेशातील ७६१, तर पुणे परिसरातील ६२८ प्रकल्पांचा समावेश आहे.
महारेराने स्थगित केलेल्या प्रकल्पांत उत्तर महाराष्ट्र १३५, विदर्भ ११०, मराठवाडा १००, दादरा नगर हवेली १३ आणि दमणमधील तीन प्रकल्पांचाही समावेश आहे. या स्थगित प्रकल्पांची यादी महारेराच्या संकेतस्थळावर आहे. ग्राहकांनी अशा प्रकल्पांत गुंतवणूक करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन महारेराने केले आहे. महारेराच्या नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक बिल्डरला प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख प्रस्तावात नोंदवावी लागते. भोगवटा प्रमाणपत्र सादर करावे लागते. प्रकल्प अपूर्ण असेल तर नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करावी लागते. प्रकल्प सुरू करण्यात अडचणी असल्यास प्रकल्प रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते.
१) राज्यातील एकूण प्रकल्पांचा आढावा घेऊन ६ हजार ६३८ प्रकल्पांना ३० दिवसांची कारणे दाखवा नोटीस.
२) ३ हजार ७५१ प्रकल्पांपैकी काहींकडून त्याच्या पूर्णत्वाचे प्रपत्र महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत.
३) काहींचे नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज.
४) काहींकडून प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर.
५) २८८७ प्रकल्पांपैकी १७५० प्रकल्प स्थगित, उर्वरित ११३७ प्रकल्पांवर स्थगितीची कारवाई सुरू.
प्रकल्प सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत बिल्डरकडे त्याची जेवढी माहिती उपलब्ध असते; तेवढी घर खरेदीदारालाही असायला हवी. यासाठी महारेरा या क्षेत्राचे सूक्ष्म नियंत्रण करत आहे. त्यासाठी कक्ष स्थापन केला आहे. महारेराकडे नोंदविलेल्या प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती संकेतस्थळावर अद्ययावत करायलाच हवी. प्रत्येक प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याबाबतही महारेरा आग्रही आहे. - अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा