Join us

गृहप्रकल्पांची नोंदणी, घरखरेदी होणार झटपट; ‘महारेरा’चे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 10:18 AM

महारेराचे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात असून हे संकेतस्थळ महा-क्रिटी  म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी नावाने ओळखले जाईल.

मुंबई : महारेराचे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात असून हे संकेतस्थळ महा-क्रिटी  म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी नावाने ओळखले जाईल. या संकेतस्थळावर प्रकल्पांची नोंदणी, नूतनीकरण आणि दुरुस्त्या, एजंट्सची नोंदणी-नूतनीकरण, घर खरेदीकरार आणि तक्रारी ही कामे करता येणार आहेत.

३१ ऑगस्टच्या मध्यरात्री पूर्ण क्षमतेने सेवेत येण्यापूर्वी १३ ते  ३१ ऑगस्ट या काळात हे संकेतस्थळ बिल्डर आणि एजंट्स यांच्यासाठी बंद राहील. घर खरेदीदारांना नेहमीप्रमाणे सुविधा सुरू राहतील. फक्त २० ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ३१ ऑगस्टपर्यंत त्यांना ऑनलाईनऐवजी स्वहस्ते अर्ज करावे लागतील.  तक्रारींच्या सुनावण्याही विनाखंड सुरूच राहतील. बिल्डर आणि एजंट्स यांना मात्र १३ ऑगस्टपर्यंत काम करता येईल. त्यानंतर १३ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संकेतस्थळ उपलब्ध राहणार नाही. या मंडळींनी १३ ऑगस्टपूर्वी सादर केलेल्या बिनचूक अर्जांवर महारेराचे अधिकारी कार्यवाही करतील.

अनेक सुविधा-

महारेराने ७ वर्षांपूर्वी मे २०१७ रोजी तयार केलेल्या संकेतस्थळात काळसुसंगत बदल करण्यास सुरुवात केली आहे. हे संकेतस्थळ तयार करताना व्यवसायकेंद्री, माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक बुद्धिमत्ता विश्लेषणाचा वापर करून व्यवस्थापनाची कामे होणार आहेत.  

चॅटबॉटचाही समावेश-

१) महाक्रिटी संकेतस्थळाचा उद्देश एकाच स्रोतातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचा एकात्मिक प्रणालीमार्फत सर्व प्लॅटफॉर्मवर तपशील उपलब्ध करून देणे आहे.

२) घरखरेदीदार, बिल्डर, एजंट्स अशा  सर्व वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक डॅशबोर्ड, यंत्रणेमार्फत स्मरणपत्रे, अधिसूचना, अनुपालन अहवाल, त्रैमासिक प्रगती अहवाल, तक्रार व्यवस्थापन या बाबी उपलब्ध होणार आहेत.

३) मोबाइल ॲप्लिकेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबोटही असेल, हेही या  नवीन संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असेल. 

४) काही महिन्यांपूर्वी दिवसाला ५ हजार आणि तासाला २०० च्या आसपास नागरिक संकेतस्थळाचा वापर करीत. आता दिवसाला ३४ हजारांपेक्षा जास्त लोक संकेतस्थळाचा वापर करतात. 

वर्षभर अनेक बैठका, चाचण्यांमधून हे नवे संकेतस्थळ आकाराला आले आहे. त्याचा सर्वच संबंधित घटकांना चांगला उपयोग होणार आहे. ग्राहकांना तक्रारी नोंदवणे सोपे होण्याबरोबरच प्रकल्पांची आवश्यक माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे. गुंतवणूक केलेली असल्यास किंवा करायची असल्यास संबंधित प्रकल्पाची सद्य:स्थिती सहजपणे पाहता येईल. बिल्डर आणि एजंट्स यांना महारेराशी व्यवहार करणे अधिक सोपे व्हावे, असे माॅड्युल्स राहणार आहेत. - अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा 

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगराज्य सरकार