मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या उभारणीमुळे काळबादेवी आणि चिराबाजार परिसरातील बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पावले मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने उचलली आहेत. लवकरच या भागात १६ मजली टोलेजंग व्यावसायिक इमारत उभारून दुकानदारांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी जवळपास ४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मेट्रो ३ मार्गिकेच्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गिकेच्या उभारणीदरम्यान काळबादेवी आणि चिराबाजार परिसरातील अनेक रहिवासी इमारती आणि दुकाने बाधित झाली होती. गिरगाव आणि काळबादेवी स्थानकाच्या उभारणीसाठी या इमारती तोडाव्या लागल्या होत्या. या रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरात करण्याच्या अनुषंगाने एमएमआरसीकडून उपाययोजना आखण्यात आली आहे. त्यानुसार या भागातील ४२३ निवासी आणि २८९ अनिवासी रहिवाशांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया एमएमआरसीने हाती घेतली आहे. त्यानुसार या भागात सुमारे ५० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर ही १६ मजली इमारत बांधली जाणार आहे. कळबादेवी येथील के २ भागात ही इमारत उभारली जाणार आहे.
दरम्यान, एमएमआरसीकडून के१, के२ आणि के३, अशा तीन इमारती उभारल्या जात आहेत. यातील के१ आणि के२ इमारतींचे काम सुरु असून, या निवासी इमारती असतील.
१) इमारतींचे मजले - १६
२) बांधकाम कालावधी - २८ महिने
३) इमारतीचे बांधकाम क्षेत्र ५० हजार चौरस फूट
४) बांधकामासाठी अपेक्षित खर्च४९ कोटी रुपये
२८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचा मानस-
१) के२ ही इमारत पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाची असेल. या इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
२) येत्या काही दिवसात कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया एमएमआरसीकडून पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३) दरम्यान, या इमारतीत पहिल्या तीन मजल्यांवर मच्छी मार्केट उभारले जाणार आहे.
४) चौथ्या ते सोळाव्या मजल्यापर्यंत व्यावसायिक गाळे उभारले जाणार आहेत. कंत्राटदार नेमल्यावर २८ महिन्यांत इमारतीचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.