मुंबई : नीट युजी परीक्षेतील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) २६ जुलैला नीट युजी परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. आता विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळावर ४ ते ६ ऑगस्टदरम्यान हा सुधारित निकाल नोंदविता येणार आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट युजी परीक्षेतील गुणही ग्राह्य धरले जातात. यंदा नीट युजीचा निकाल २३ जूनला जाहीर झाला होता. मात्र, नीट युजी परीक्षेत गोंधळ झाल्याने १५६३ उमेदवारांची परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल जाहीर करण्याचे निर्देश एनटीएला दिले होते. त्यानुसार एनटीएने २६ जुलैला निकाल जाहीर केला आहे.
सीईटी सेलने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची नोंदणी ३० जुलैला पूर्ण केली आहे. मात्र, तोपर्यंत काही विद्यार्थ्यांना सुधारित निकाल समाविष्ट करता आला नव्हता. परिणामी प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ज्यांनी नीटच्या निकालाच्या आधारे नोंदणी केली आहे, त्यांना सुधारित निकालाची नोंद करण्याची सोय सीईटी कक्षाने उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांना ४ ते ६ ऑगस्टदरम्यान सुधारित निकाल नोंदविता येणार आहे.
काय करावे?
१) विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रावरून सुधारित निकालाची नोंद करावी, तसेच सुधारित गुणपत्रिका समाविष्ट करून त्याची पडताळणी करून घ्यावी.
२) ज्या विद्यार्थ्यांनी ई पडताळणी पद्धतीने अर्जाची पडताळणी करून घेतली आहे, त्यांनी ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या लॉगीनमधून तक्रार दाखल करून नीट युजी परीक्षेचे सुधारीत गुण भरावेत.
३) निकालाची प्रत अपलोड करून अर्ज ई पडताळणीसाठी नव्याने सादर करावा, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे.