सुट्या पैशांचे टेन्शन मिटले; पण प्रवाशांच्या रांगांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 11:14 AM2024-08-19T11:14:04+5:302024-08-19T11:15:44+5:30
मुंबई शहर, उपनगरातील रेल्वेस्थानकांवरील तिकीटघरात क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांचे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई शहर, उपनगरातील रेल्वेस्थानकांवरील तिकीटघरात क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांचे सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. मात्र, तिकीट घरावरील रांग कमी व्हावी म्हणून लावण्यात आलेल्या तिकीट मशिन्स बंद किंवा कमी असल्याने रांगांचे टेन्शन कायम आहे.
दादर, कुर्ला, घाटकोपर या रेल्वेस्थानकांवर लावण्यात आलेल्या काही मशिन्स बंद आहेत, तर काही सुरू आहेत. ज्या सुरू आहेत त्या मशीन दोन ते तीन असल्या तरी प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत.
टेक्नोसॅव्ही प्रवासी वाढले-
१) मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडत असून, टेक्नोसॅव्ही प्रवाशांची संख्या मोठी आहे.
२) तरुण, नोकरदार ॲपचा अधिक वापर करत आहेत. ॲपवरून काढल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढत आहे.
३) कॉन्टॅक्टलेस तिकीट, कॅशलेस व्यवहार आणि तिकीट बुक करताना ग्राहकांची सोय या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जात आहे.
४) ‘यूटीएस’ ऑन मोबाइल ॲप वापरण्याचा एक अतिरिक्त फायदा म्हणजे प्रवाशांना ‘आर-वॉलेट’ रिचार्जवर तीन टक्के बोनस मिळत आहे.
कोणत्या स्थानकांत काय परिस्थिती?
१) अंधेरी रेल्वे स्थानक-
अंधेरी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला तिकीट खिडकीएवढीच रांग मशिन्ससमोर लागलेली असते. मशीनवरील ऑपरेटर खिडकीवरील ऑपरेटच्या तुलनेत अधिक वेगवान असल्याने कमी वेळात येथे तिकीट मिळते.
२) दादर रेल्वे स्थानक-
दादर स्थानकावर ब्रिजवर पश्चिम टोकाला दोन मशीन ठेवण्यात आहेत. तेथे गजरे विकणाऱ्या बायका, त्यांची पोरबाळे यांचा गराडा असतो. तिकीट घेण्यासाठी लागणारी लाइन वेडीवाकडी असते.
३) इतर स्थानके-
वांद्रे, मुंबई सेंट्रल, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर, मुलुंडसारख्या मोठ्या रेल्वेस्थानकांवर तिकीट देणाऱ्या मशिन्सची संख्या अपेक्षित आहे. कारण या रेल्वेस्थानकांवर पीक अवरला तिकिट काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
कुर्ला रेल्वे स्थानकातील समस्या कायम-
कुर्ला रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील तिकीट घरात तीनपेक्षा जास्त मशीन आहेत. मात्र, तीन तिकीट घरांपेक्षा मोठी रांग या मशीनवर असते. सांताक्रूझ रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला तिकीट देणाऱ्या दोन मशिन्स कित्येक महिन्यांपासून त्याकडे कोणी फिरकत नाही. कारण इकडे गर्दी कमी असते आणि रेल्वे तिकीट खिडक्यांची संख्या प्रवासी तुलनेत अधिक असल्याने मशीनकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.