Join us  

मालवणीत खारफुटीवर निवासी बांधकामाचा घाट, बिल्डरांसाठी आरक्षणात बदल? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 10:29 AM

मालवणी गावातील सीटीएस क्रमांक २ मध्ये घनदाट खारफुटी असून हे क्षेत्र पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय खारफुटीच्या जागेचा भाग आहे.

मुंबई : मालवणी गावातील सीटीएस क्रमांक २ मध्ये घनदाट खारफुटी असून हे क्षेत्र पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय खारफुटीच्या जागेचा भाग आहे. त्यामुळे नैसर्गिक विभाग आणि ना-विकास क्षेत्र म्हणून आरक्षित असलेल्या या जमिनीचे आरक्षण निवासी म्हणून करण्याचा घाट घातला जात आहे. त्याचबरोबर बिल्डर लॉबीला मदत करण्यासाठी आरक्षण बदलले जात आहे का, असा सवाल केला जात आहे.

पालिकेने ३ ऑगस्टला वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध केली असून, त्यात बृहन्मुंबईच्या मंजूर भाग विकास आराखडा २०३४ मध्ये प्रस्तावित स्वरूपाच्या सुधारणांसाठी सूचना व हरकती मागविल्या आहेत. गावठाणे, कोळीवाडे व आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली मंजूर करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेला वेळ नाही. मात्र, खारफुटीवर निवासी बांधकाम करण्यास कशी काय परवानगी दिली जात आहे, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेन्टा यांनी केला.

शहराचा विकास आराखडा नागरिकांच्या जीवनाला आकार देतो. येत्या २० वर्षांत मुंबईचा विकास कसा होईल, याचा या आराखड्यात समावेश आहे. भविष्यातील विकास आणि आपल्या शहराच्या शाश्वत, सर्वसमावेशक विकासाचा आराखडा म्हणून त्यास महत्त्व आहे. गृहनिर्माण संस्था, आर्थिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि वाहतूक, पर्यटन धोरणे एकत्र येऊन जास्तीत जास्त परिणाम कसे साधतात, याचाही तपशील आराखड्यात दिला आहे.

'पर्यावरणाला मोठा धोका'-

मालवणी गावातील सीटीएस क्रमांक २ च्या निवासी वापरासाठीच्या क्षेत्रातील प्रस्तावित बदलामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार असून विकास आराखड्याची अखंडता धोक्यात आली आहे. आम्ही या बदलास कडाडून विरोध करत असून या बदलाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी पालिकेकडे केली आहे, असेही गॉडफ्रे पिमेन्टा यांनी सांगितले.

विकास आराखड्याची मोडतोड का?

शाश्वत विकासाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी, मुंबईकरांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आणि आपल्या शहरासाठी व्यापक दृष्टिकोन देण्यास मदत करण्यासाठी विविध धोरणात्मक क्षेत्रांमधील हे एकत्रीकरण महत्त्वाचे आहे. या विकास आराखड्याद्वारे शहराची निर्मिती करण्यावर भर द्यायला हवा, असे असताना या आराखड्याची मोडतोड का केली जात आहे, असाही सवाल गॉडफ्रे पिमेन्टा यांनी केला.

टॅग्स :मुंबईनगर पालिका